तामिळनाडूत आर्मी हेलिकॉप्टरमध्ये जखमी झालेले आणि सध्या जीवन मरणाशी संघर्ष करणारे ग्रुप कॅप्टन वरुणसिंग यांचं एक पत्र सध्या व्हायरल होतंय. त्यांनी हे पत्र त्यांच्या शाळेतल्या प्रिन्सिपलला लिहिल्याचं सांगितलं जातंय. पत्र खरं की खोटं हे नंतर कळेलच पण त्या पत्रात जे काही लिहिलं गेलंय ते मात्र प्रेरणादायी आहे. शाळेतल्याच मुलांनी नाही तर पालकांनी, नोकरी करणाऱ्यांनीही ते वाचायला हवं. कारण अनेक प्रश्नांची उत्तर त्या पत्रात मिळतात. आपला जो काही मानसिक झगडा रोज होतो, त्यातूनही कदाचित सुटका होऊ शकेल.
वरुणसिंग हे अनेक वीरता पुरस्कारानं सन्मानित आहेत. शौर्य चक्रनं सन्मानीत असलेले वरुणसिंग सध्या मात्र मृत्यूशीही दोन हात करतायत. संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, वरुणसिंग हे सध्या बंगळुरुच्या हॉस्पिटलमध्ये असून लाईफ सपोर्ट सिस्टीमवर आहेत.
वरुणसिंग यांनी चंडी मंदिरच्या आर्मी पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतलेलं आहे. त्याच शाळेच्या प्रिन्सिपलला 18 सप्टेंबर 2021 ला त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र म्हणजे वरुणसिंग शाळेत असताना कसे होते आणि नंतर त्यांचे विचार, आचरण कसं बदलत गेलं यावर प्रकाश टाकणारं आहे. पत्रात ते म्हणतात- साधारण असणं ठिक आहे. प्रत्येक जण काही शाळेत उत्कृष्ट असतोच असं नाही. प्रत्येकाला काही 90 टक्क्याचा स्कोअर करता नाही येणार. पण जे करतायत ते खरंच अद्भूत आहे. त्याची स्तुती केलीच पाहिजे. पण ज्यांना हे जमत नाही, त्यांनी असा विचार करु नये की ते साधारण बुद्धीमत्तेचे आहेत. म्हणजे जीवनात येणाऱ्या गोष्टींना ठरवणारी ही काही एकमेव बाब नाही. तुम्हाला कशात रस आहे ते शोधा. संगीत, ग्राफिक डिझाईन, साहित्य कशातही तुमची रुची असू शकते. तुम्ही जेही काम करताय, त्याला पूर्णपणे समर्पित असा. सर्वश्रेष्ठ प्रदर्शन कसं करता येईल ते बघा. हा विचार करुन कधी बेडवर झोपायला जाऊ नका की मी अजून प्रयत्न करु शकलो असतो.
एक युवा कॅडेट म्हणून माझ्यात आत्मविश्वास कमी होता. एका लढवय्या स्क्वाड्रनमध्ये युवा फ्लाईट लेफ्टनंट झाल्यानंतर मला जाणीव झाली की, मी थोडं डोकं लावलं, मनापासून रस घेतला तर मी आणखी चांगलं करु शकतो. त्यानंतर मी सर्वश्रेष्ठ बनण्यासाठी काम सुरु केलं. मला फक्त ‘पास’ होण्याच्या अटी पूर्ण करायच्या नव्हत्या.
पत्रात ते पुढं लिहितात- राष्ट्रीय सुरक्षा अकादमी म्हणजेच एनडीएत त्यांनी एक कॅडेट म्हणून ना खेळात ना अभ्यासात उत्कृष्ट प्रदर्शन केलं. पण मी जेव्हा आयएएफमध्ये दाखल झालो तेव्हा मला जाणीव झाली की मला विमानात खास रुची आहे, ते माझं पॅशन आहे, आणि त्यानंच मला माझ्या सहकाऱ्यांवर ‘बढत’ मिळवून दिलीय. एवढं असूनही मला माझ्या वास्तविक क्षमतांवर भरोसा नव्हता.
वरुणसिंग यांना जेव्हा शौर्य चक्र मिळालं, त्यावेळेस त्याचं श्रेय त्यांनी मिल्ट्री स्कूल, एनडीए आणि त्यानंतर एअरफोर्समधले त्यांचे वर्षानुवर्ष जोडले गेलेल्या सहकाऱ्यांना दिलं. त्यावरही ते लिहितात- माझा असा विश्वास आहे की, मी जे काही काम केलंय, कामगिरी बजावलीय, ती माझे शिक्षक, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सल्ल्याचा परिणाम आहे.