एनआयए जारी केलेल्या या व्हिडीओच्या दाव्यानुसार जनरल बिपीन रावत आणि त्यांचे साथीदार
याच हेलिकॉप्टरमध्ये बसले होते. अपघातस्थळा जवळ पर्यटनासाठी आलेले काही लोक हेलिकॉप्टरचा व्हिडीओ शूट करत होते. मात्र त्याचदरम्यान हेलिकॉप्टर कोसळल्याचा आवाज आला आणि अपघाताचा आवाज सुद्धा या व्हिडीओत कैद झाला. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांसह काही नेत्यांनी अपघाताबाबत काही शंका उपस्थित केल्या आहेत. आणि दुसरीकडे हेलिकॉप्टर नेमकं कोसळलं कसं, याचा तपास करणाऱ्या टीमला घटनास्थळावरुन ब्लॅकबॉक्सही सापडलाय.
सकाळपासून दुर्घटनेची चौकशी करणारी टीम ब्लॅकबॉक्स शोधत होती. विशेष म्हणजे बरीच शोधाशोध केल्यानंतर अपघाताच्या ठिकाणापासून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर ब्लॅकबॉक्स हाती लागला. ब्लॅकबॉक्स विमान किंवा हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या कारणासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो. विमान किंवा हेलिकॉप्टरचा कितीही भीषण अपघात झाला, तरी ब्लॅकबॉक्सला हानी पोहोचत नाही. ब्लॅकबॉक्सची बनावट तशीच केली असते, ज्यामुळे आग, धडक किंवा क्रॅश होताना ब्लॅकबॉक्स सुरक्षित राहतो. अपघाताआधी पायलट आणि कंट्रोल रुममध्ये झालेला संवाद, संदेशाची देवाण-घेवाण असं सर्व रेकॉर्ड ब्लॅकबॉक्समध्ये सापडतं आजवर अनेक अपघात कश्यामुळे घडले, तो घातपात होता की मग तांत्रित बिघाड, याची उकल याच ब्लॅकबॉक्समुळे होऊ शकलीय.
दुसरी गोष्ट म्हणजे हेलिकॉप्टर अपघाताआधी पायलटने कोणताही मे डे कॉल केला नाही. मे डे कॉल हा इमर्जन्सीवेळी कंट्रोलरुमल केला जातो. कोणताही तांत्रिक बिघाड किंवा संकट ओढावलं तर क्रू मेंबर कंट्रोलरुमला संपर्क करतात. आणि ३ वेळा मे डे असा शब्द उच्चारतात. मात्र या अपघातावेळी क्रू मेंबर्सकडून कोणताही मे डे कॉल आला नसल्याची माहिती आहे. जिथं अपघात घडला त्या कुन्नूर भागात सैन्याची छावणी आहे. इथल्याच एका कार्यक्रमात बिपीन रावत हजर राहणार होते.
विशेष म्हणजे अपघातस्थळापासून लँडीगचं ठिकाण फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर होतं. त्यामुळे अपघाताआधी हेलिकॉप्टर लँडिंगच्या तयारीत असल्याचीही प्राथमिक माहिती आहे.
कुन्नूर हा भाग निलगिरीच्या पर्वतरांगांमध्ये येतो. दाट जंगल, चहाचे मळे आणि पर्वतांशी स्पर्धा करणारी निलगिरीची झाडं हे या भागाचं वैशिष्ठय आहे. जेव्हा अपघात झाला तेव्हा दाट धुकं आणि रिमझिम पाऊस सुरु होता. मात्र व्हीव्हीआयपी अधिकारी जेव्हा उड्डाण करतात, तेव्हा हवामानाचा अंदाज घेतला गेला नाही का, उड्डाणाआधी हेलिकॉप्टरची तपासणी झाली नाही का, असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.