मुंबईतील मानखुर्द परिसरात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मानखुर्द परिसरातील भंगाराच्या गोदामाला आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. ही आग इतकी भीषण होती की आगीच्या मोठ मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट लांब-लांबून दिसत होते.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. या भीषण आगीचे व्हिडीओ समोर आले आहेत. ते पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होताच आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आणि त्यासोबतच शेजारील वस्तीत राहणाऱ्या नागरिकांचे तात्काळ स्थलांतर केले. तसेच नागरिकांच्या घरातील गॅस सिलिंडर सुद्धा तात्काळ घरातून बाहेर काढण्याच्या सूचना केल्या जेणेकरुन मोठी दुर्घटना होऊ नये.
अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या कुलिंग ऑपरेशनचे काम सुरू आहे. या घटनेत सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झालेली नाहीये. या ठिकाणी अशाप्रकारे आग लागण्याच्या यापूर्वी सुद्धा अनेकदा घटना घडल्या आहेत. येथे अनेक अनधिकृत गाळे असल्याचा आरोप वारंवार होत असतो मात्र, त्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाहीये.