पुन्हा साखळी बॉम्बस्फोटाच्या
तयारीत होते ते सहा अतिरेकी
दिल्ली पोलिसाच्या विशेष पथकाने मुंबईचा रहिवासी असलेल्या जान मोहम्मद शेखसह एकूण ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. मोठा घातपात घडवून आणण्याचं या दहशतवाद्यांचं नियोजन होतं, असं सांगितलं जात होतं. दिल्ली पोलिसांचं विशेष पथक या ६ दहशतवाद्यांची चौकशी करत असून त्यातून आता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या दहशतवाद्यांना सर्व विस्फोटकांचा वापर करून पुन्हा एकदा मुंबईवरील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांप्रमाणेच स्फोट घडवून आणायचे असल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्यांच्या अटकेमुळे मोठ्या घातपाताचा कट उधळल्याचं स्पष्ट झालं आहे.
मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या
तरुणाने केली आत्महत्या
जालना जिल्ह्यातील एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत या नैराश्यातून सदाशिव शिवाजी भुंबर या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना जालन्यातील परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. “अनेकवेळा पाठपुरावा, आंदोलनं केली. शासनाकडून ठोस कार्यवाही केली नाही. माझी सूचना आहे कि सरकारने आता तरी जागं व्हावं आणि याविषयात जातीने लक्ष घालावं”.
भारताच्या विकास दरात
७.२ टक्के वाढ होण्याची शक्यता
भारताच्या विकास दरात २०२१ मध्ये ७.२ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु पुढील वर्षी आर्थिक वाढ मंदावेल. कारण करोना महामारीचा नकारात्मक परिणाम आणि खाद्यान्न महागाईचा खासगी वापरावर नकारात्मक परिणाम होईल. UNCTAD (United Nations Conference on Trade and Development) चा व्यापार आणि विकास अहवाल २०२१ बुधवारी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जागतिक अर्थव्यवस्था २०२१ मध्ये मजबूत पुनर्प्राप्तीसाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे.
सर्वप्रथम आम्ही देशातील शहिदांना
आदर देण्याचे काम केले : पंतप्रधान
आम्ही काम करण्याची नवी शैली स्वीकारली आहे. तुम्ही मला २०१४ मध्ये सेवा करण्याची संधी दिली. सरकारमध्ये येताच संसद भवन बांधण्याचे काम सुरू करू शकलो असतो. मात्र सर्वप्रथम आम्ही ज्यांनी देशासाठी प्राण दिले त्यांच्यासाठी स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला. जे काम स्वातंत्र्यानंतर लगेच करायला हवे होते, ते आज आम्ही करत आहोत. सर्वप्रथम आम्ही देशातील शहिदांना आदर देण्याचे काम केले,” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
चार धाम यात्रेवरील बंदी
उच्च न्यायालयाने उठवली
चार धामच्या दर्शनासाठी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. करोना संसर्गामुळे उत्तराखंडमध्ये स्थगित चार धाम यात्रेवरील बंदी उच्च न्यायालयाने उठवली आहे. गुरुवारी, उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, यात्रा बंदीचा २८ जूनचा निर्णय मागे घेतला आहे. कोविडच्या नियमांचे पालन करत न्यायालयाने चारधाम यात्रा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
सत्ता मिळाल्यास 300 युनिट
वीज मोफत देणार
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण चांगलच तापायला लागलं आहे, सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, जास्तीजास्त मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आम आदमी पार्टीने देखील मोठी घोषणा केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली आहे. जर उत्तर प्रदेशमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आलं तर राज्यातील जनतेला ३०० यूनिट मोफत वीज दिली जाईल, असं सांगितलं आहे.
गुजरातमध्ये आज २४ नव्या
मंत्र्यांनी घेतली शपथ
गुजरातमध्ये आज २४ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. विशेष म्हणजे रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला स्थान देण्यात आलेलं नाही. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील २२ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यात माजी उप मुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही समावेश आहे. भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळात एकूण २४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात १० जणांना कॅबिनेट मंत्रिपद, तर १४ जणांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. मंत्रिमंडळाची पहिली मंत्रिमंडळ बैठक लगेच घेण्यात येणार आहे.
शाळकरी मुलांच्या खात्यात
जमा झाले नऊशे कोटी रुपये
बिहारच्या कटिहारमधील एका गावातून समोर आलाय. इथे लहान मुलांच्या खात्यांमध्ये थोडेथोडके नाही, तर तब्बल ९०० कोटी रुपये जमा झाल्याची माहिती मिळतेय. ज्या मुलांच्या खात्यात ही रक्कम जमा झालीए ते दोघंही शाळेत शिकतात आणि खात्यात जमा झालेली एवढी रक्कम पाहून त्यांना धक्का बसलाय. तर दुसरीकडे जसे कोट्यवधी रुपये शाळकरी मुलांच्या खात्यात जमा झाले तसेच आपल्याही खात्यात झाले असावेत, या आशेवर या रहिवासी त्यांचे पासबुक घेऊन एटीएम आणि बँकांमध्ये धाव घेत आहेत.
चांगले रस्ते हवे असतील
तर पैसे द्यावेच लागतील
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज राष्ट्रीय महामार्गांवरील टोलसंदर्भात महत्वाचं भाष्य केलं आहे. चांगली सेवा हवी असेल, चांगले रस्ते हवे असतील तर लोकांना पैसे द्यावेच लागतील, असं गडकरी म्हणाले आहेत. मात्र गडकरींनी आगदी खास शैलीमध्ये टोलसंदर्भातील प्रश्नावर उत्तर दिलं.
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा होत्या. त्यानंतर पक्षप्रवेशासाठी आजचा मुहूर्त ठरला होता, त्यानुसार पुणेकर यांचा पक्षप्रवेश झाला. “राष्ट्रवादीत प्रवेश करून मला आनंद झाला. माझं स्वप्न होतं राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं ते आज पूर्ण झालंय. दरेकरांनी जे म्हटलं ते ऐकून वाईट वाटलं. त्या वक्तव्याचा मी निषेध करते. त्यांनी तसं बोलायला नको होतं,” असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या.
निवृत्त आयएएस अधिकाऱ्याच्या
घरावर छापेमारी
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरूवारी नवी दिल्लीत सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आणि कार्यकर्ते हर्ष मंदर यांच्या घर व कार्यालयावर आज छापेमारी केली. सुत्रांनी सांगितले की, मंदर हे पत्नीसह जर्मनीला रवाना झाल्याच्या काही तासानंतर ही छापेमारी करण्यात आली.
SD social media
9850 60 3590