पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं काल (30 डिसेंबर 2022) पहाटे अहमदाबादमध्ये निधन झाले. हिराबेन यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आईचं निधन आणि तिच्या अंत्यविधीनंतर नरेंद्र मोदी यांनी स्वतःचं दुःख बाजूला ठेवून, लगेच सरकारी कामं करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. मोदींच्या व्यक्तिमत्त्वातला हा गुण त्यांचं वेगळेपण सिद्ध करणारा ठरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्यसंस्कारापूर्वी नरेंद्र मोदी यांनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला. गेली आठ वर्षं देशाचे पंतप्रधान म्हणून आणि त्याआधी सुमारे साडेतेरा वर्षं गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदींना त्यांच्या सुशासनामुळे देश आणि जगभरात त्यांना प्रसिद्धी मिळत आहे; पण इथे मोदी ना पंतप्रधानांच्या भूमिकेत होते, ना देश किंवा जगातल्या प्रशंसनीय नेत्याच्या. इथे ते मोदी होते जे त्यांच्या आई हिराबेनचे नरेंद्र होते. स्मशानभूमीत उपस्थित असलेल्या 50 ते 60 जणांमध्ये पंतप्रधान मोंदीच्या चेहऱ्यावरच्या भावना स्पष्ट दिसत होत्या. तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांनी भावाच्या घरी फार वेळ घालवला नाही. आईचं पार्थिव वाहनात ठेवून गांधीनगरच्या सेक्टर 30 मधल्या मुक्तिधामध्ये आणण्यात आलं. या मुक्तिधामचा कायापालट खुद्द मोदी यांनी 2002 ते 2007 दरम्यान केला होता. मुक्तिधामच्या प्रवेशद्वारी हिराबेन यांचं पार्थिव वाहनातून खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर मोदी यांनी पार्थिवाला खांदा देऊन ते लाकडी चितेवर आणलं. त्यानंतर पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. सकाळी नऊ वाजून बावीस मिनिटांनी हिराबेन यांना मुखाग्नी देण्यात आला. या वेळी पंतप्रधान मोदींसमवेत थोरले भाऊ सोमाभाई आणि धाकटे बंधू पंकज मोदी उपस्थित होते. चिता जळत असताना नरेंद्र मोदी ती न्याहाळत उभे होते. अधूनमधून चितेवर तूप अर्पण करत होते.
हिराबेन नरेंद्र यांच्या जीवनात एक मोठं शून्य ठेवून निघून गेल्या होत्या. त्याची भरपाई आता शक्य नव्हती. त्या वेळी नरेंद्र मोदी यांनी साश्रू नयनांनी आपल्या आईला शेवटचा निरोप दिला. आईला डोळे भरून पाहण्याची ही शेवटची वेळ होती. यानंतर मोदींकडे आईच्या केवळ आठवणी राहणार होत्या. वैयक्तिक दुःखद प्रसंगामुळे सार्वजनिक कामांमध्ये अडथळा निर्माण व्हायला नको, यासाठी मोदींनी अर्ध्या तासानंतर राज्य सरकारचे मंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना स्मशानातून जाण्याची सूचना केली. त्यांनी बहुतांश सहकारी, मंत्र्यांना अंत्यसंस्काराला येण्यास मनाई केली होती. स्वतःच्या पक्षातले नेते, केंद्रातले मंत्री आणि मुख्यमंत्र्यासह अन्य राज्यांमधील विरोधी पक्षाच्या मु्ख्यमंत्र्यांनीही मोदी यांच्या आईच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली होती; पण त्यांना यासाठी नकार कळवण्यात आला होता.
हिराबेन यांची चिता सुमारे एक तास जळत होती. शेवटच्या अर्ध्या तासात केवळ 25 ते 30 जण तिथं उपस्थित होते. त्यात नातेवाईक आणि जवळच्या सहकाऱ्यांचा समावेश होता. मोदींनी सर्वांना जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुःखाचा काळ वैयक्तिक नातेसंबंधांतली कटुता कशी संपवतो हे या वेळी लोकांनी पाहिले. कधी काळी भाजपात सहकारी असलेले आणि 1995 मध्ये बंड केलेले शंकरसिंह वाघेला हिराबेन यांचं पार्थिव स्मशानात दाखल होण्यापूर्वी तिथं उपस्थित होते. मोदी तिथं पोहोचल्यावर त्यांनी दुःख व्यक्त केलं. त्या वेळी वाघेला म्हणाले, ‘जेव्हा तुम्ही आणि मी भेटत असू तेव्हा मी आवर्जून तुमच्या आईच्या तब्येतीची चौकशी करत असे; मात्र यापुढे मी काय विचारणार?’
खरं तर हा प्रश्न नरेंद्र मोदींच्या मनातही आला असेल. कारण आता आईच्या मायेची भरपाई करणारं कोणीच नाही. आई ही आई असते, तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. नेमक्या याच भावना मोदींना अस्वस्थ करत असाव्यात. त्यामुळे ते आईच्या चितेजवळ स्तब्धपणे उभे होते आणि चितेकडे पाहत होते. या वेळी काही मोजक्या लोकांना मोदींच्या या संवेदनशील स्वभावाचं दर्शन झालं. त्या वेळी ते देशाचे पंतप्रधान नाही तर हिराबेन यांचा मुलगा म्हणून उपस्थित होते आणि पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या आईला शेवटचा निरोप देत होते.
परंतु, आईच्या चितेकडे पाहताना कदाचित मोदींना तिची शिकवण पुन्हा आठवली असेल. ‘आपला वेळ खासगी चिंता आणि दुःख करण्यात घालवू नको, सार्वजनिक हित आणि जनतेची चिंता करण्यात वेळ घालव,’ अशी शिकवण हिराबेन यांनी मोदींना दिली होती. त्यामुळे सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांनी आईचं पार्थिव स्मशानात आणल्यानंतर ते दहा वाजून दहा मिनिटांनी तिथून निघाले आणि जवळच्या राजभवनात पोहोचले. तिथून ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अनेक शासकीय कामांसाठी उपस्थित राहिले. आईकडे येतानाची साधेपणाची भावना आईच्या शेवटच्या प्रवासादरम्यानही अबाधित राहिली. पंतप्रधानांच्या ताफ्याऐवजी मोदींनी स्मशानभूमीत फक्त एक गाडी आणली होती. मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा प्रवास करताना आईच्या बाबतीत जे काही केलं तेच आज कायम होतं. यात कुठेही दिखाऊपणा किंवा व्हीआयपी कल्चर नव्हतं.
जो मुलगा काही वेळेपूर्वी आपल्या आईच्या चितेजवळ होता तो काही मिनिटांनी देशाचा पंतप्रधान म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पश्चिम बंगालमधल्या जनतेसाठी पायाभूत सुविधांशी निगडित 7800 कोटी रुपयांचा प्रकल्प लाँच करत होता. हीच गोष्ट मोदींना खास बनवते. त्यांच्या या गुणांबद्दल हिराबेन यांना अभिमान होता. आता आठवणींमधून त्याच मोदींना प्रेरणा देत राहतील.
मोठ्या समस्या आणि आव्हानांमधून खंबीरपणे बाहेर पडलेल्या मोदींसाठी आईच्या निधनाचा क्षण कधीच भरून निघणारा नव्हता. साडेपाच दशकांहून अधिक काळाच्या सार्वजनिक जीवनात त्यांच्यासाठी वैयक्तिक फक्त एकच गोष्ट होती, ती म्हणजे आई. आई, जी नेहमी आपल्या मुलाला प्रेरणा देत असे. तिच्या शब्दांचा, शिकवणीचा खोलवर परिणाम नरेंद्र मोदींच्या मनावर झाला. देश आणि जगाला हिराबेन यांच्या निधनाचं वृत्त आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समजलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्विट करून या संदर्भात माहिती दिली. या ट्विटमध्ये त्यांच्या आईसोबत असलेल्या घट्ट नात्याची झलक पाहायला मिळाली. 18 जून 2022 रोजी आईच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने मोदी गांधीनगरमध्ये होते. त्यावेळी तिनं आपल्या या मुलाला आशीर्वाद देताना ‘बुद्धीने काम करा, जीवन पवित्रतेनं जगा’ अशी शिकवण दिली होती. हिराबेन या नरेंद्र मोदींना नेहमीच त्रिमूर्ती वाटत असे. त्या म्हणजे एका तपस्वीचा प्रवास, निःस्वार्थी कर्मयोगी आणि मूल्यांसाठी वचनबद्ध जीवनाचं प्रतीक होत्या. आपल्या आईविषयीची ही भावना त्यांनी आज ट्विटच्या माध्यमातून जगासमोर मांडली. आईचा तपस्वी स्वभाव पाहून मोदी वारंवार त्यांच्याकडे यायचे. जीवनाच्या सुरुवातीला वैराग्य स्वीकारल्यावर आणि संघाचे प्रचारक झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा कुटुंबाशी संबंध राहिला नाही.
तरीही नरेंद्र मोदी यांचं त्यांच्या आईशी खास नातं होतं. त्यामुळे जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात देशाच्या विविध भागांमध्ये भटकंती आणि साधना केल्यानंतर ते एक दिवस घरी परतले. त्या वेळी ते आईला भेटले आणि आईचा आशीर्वाद घेतल्यानंतर काही दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक बनले. त्यांची आई खूप शिकलेली नव्हती. परंतु भारतीय लोकपरंपरा आणि मूल्यांचं शिक्षण तिने आपल्या मुलाला दिलं. सर्व अडचणींमध्ये मुलांचं पालनपोषण करणाऱ्या हिराबेन यांनी नेहमीच समाजासाठी चांगलं काम करण्यावर भर दिला.
7 ऑक्टोबर 2001 रोजी मोदी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते आईचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. तेव्हा ‘आयुष्यात कधीही लाच घेऊ नकोस,’ अशी पहिली शिकवण आईने आपल्या मुलाला दिली. आई हिराबेनची ही गोष्ट नरेंद्र मोदींच्या कायम स्मरणात आहे. त्यामुळे त्यांनी प्रथम गुजरात आणि नंतर देशात भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी अनेक आवश्यक कायदेशीर तरतुदींपासून थेट लाभ हस्तांतरण योजनेपर्यंत सर्व उपाययोजना केल्या.आईच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन मोदी यांनी ‘ना खाता हूं, ना खाने देता हूँ’ ही घोषणा केली आणि ती खूप लोकप्रिय झाली.