नोकरभरतीतील अडथळे दूर करण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा

राज्यात सुरू केलेल्या नोकर भरतीतील त्रुटी तपासून त्या दूर करण्याकरिता मुख्य सचिवांची समिती नेमण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासनाला केल्याचे समजते.

सरकारने काही दिवसांपुर्वी ७५ हजार नोकर भरतीची घोषणा केली होती. त्यानुसार सर्व विभागाला नोकर भरतीसाठी कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच नोकर भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सरकारने दोन कंपन्यांची निवड केली होती. ग्रामविकास विभागातील ‘क’ व ‘ड’ वर्गातील जागासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतून काही लाख इच्छुकांनी अर्ज केले आहेत.

मात्र या कंपंन्यांची राज्यातील सर्व जिल्ह्यात केंद्र नसल्यामुळे ग्रामविकास विभागापुढे पेच निर्माण झाला आहे. यातच १५ लाखांच्या आसपास अर्ज आल्याने या कंपन्यांची एकाच वेळी परीक्षा घेण्याची क्षमता नसल्याचे पुढे आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची समिती नेमण्याची सूचना सरकारने  केल्याचे समजते.

दंडाची तरतूद

गुरे ढोरे रस्त्यावर सोडणाऱ्या मालकांना आता कैदेऐवजी दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.  फौजदारी दंड संहिता व अन्य कायद्यांमध्ये असलेल्या शिक्षेच्या तरतुदींमध्ये दुरुस्त्या करून किरकोळ गुन्ह्यांसाठी तुरुंगवासाऐवजी दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

बेकरी व्यवसायाकरिता हिंदूस्थान युनिलिव्हर कंपनीस मान्यता

शासकीय जमिनीवर बेकरी व्यवसायासाठी हिंदूस्थान युनिलिव्हर कंपनीस मॉडर्न फूड एंटरप्राइझेसबरोबर व्यावसायिक करार करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अंधेरीतील परजापूर आणि बोरिवली तालुक्यातील गोरेगाव येथे मॉडर्न बेकरीज इंडिया लि. यांना कब्जे हक्काने मंजूर झालेल्या आणि हिंदूस्थान युनिलिव्हर कंपनीस शासन मान्यतेशिवाय हस्तांतरित झालेल्या जमिनीवर बेकरी व्यवसाय करण्यासाठी या करारास मान्यता देण्यात आली.  ही जमीन एकूण २२२६४ चौ. मी. इतकी आहे.  दिल्ली उच्च न्यायालयाच्या मान्यतेने मॉडर्न बेकरी कंपनीचे हिंदूस्थान युनिलिव्हर कंपनीमध्ये हस्तांतरण झाले आहे. या अनुषंगाने अनर्जित उत्पन्न वसूल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंपनीने बँक गँरटी दिली आहे. त्यानुसार पाच कोटी रुपये इतकी अग्रीम रक्कम घेऊन या करारास मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.