राज्यातील रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न होत असतानाही त्यात यश मिळालेले नाही. गेल्या दोन वर्षांत राज्यात ५९,५९७ रस्ते अपघात झाले असून त्यात २७,०८४ जणांचा मृत्यू झाला. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये (जानेवारी ते नोव्हेंबर २०२२) वाढ झाली आहे.
राज्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकार वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि विविध सामाजिक संस्थांना घेऊन दर वर्षी रस्ते सुरक्षा मोहीम राबविते. या मोहिमेनंतरही अपघातांचे प्रमाण कमी होत नाही. राज्यात २०२१ मध्ये आणि जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ मध्ये रस्ते अपघातांत ४७,७९३ जखमी झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. एकूण अपघातांपैकी २०२१ मध्ये २९ हजार ४७७ अपघात आणि १३ हजार ५२८ मृत्यू झाले असून २०२२ मध्ये ३० हजार १२० अपघातांमध्ये १३ हजार ५५६ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्येही वाढ असून २०२२ मध्ये २४ हजार ७२२ जखमींची नोंद वाहतूक पोलिसांकडे झाली असून २०२१ मध्ये हीच संख्या २३ हजार ७१ आहे.
दरम्यान राज्य रस्ते सुरक्षा अभियानाला ११ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एनसीपीए सभागृहात या अभियानाचे उद्घाटन होणार आहे.
महामार्गावर वाढते अपघात
गेली १३ वर्षे रखडलेल्या कामामुळे मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत रस्ते अपघातात १५० जणांचा मृत्यू झाला आहे. २०२१ मध्ये ११८ अपघातात ११९ जणांचा मृत्यू झाला होता. ११ डिसेंबरपासून वाहनांसाठी खुल्या झालेल्या समृद्धी महामार्गावरही अपघातांनी पन्नाशी गाठली आहे. त्यापैकी तीन अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू, तर २१ किरकोळ अपघातांमध्ये २९ जण जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे जुना मार्ग आणि मुंबई-पुणे नवीन द्रुतगती महामार्गावर २०२१ आणि २०२२ मध्ये एकूण ८७७ रस्ते अपघात झाले असून त्यात ४०७ जणांचा मृत्यू झाला आणि ५६० जण जखमी झाले.