मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी दिल्ली दौऱ्यावर होते. रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनासाठी दोघेही दिल्लीला गेले होते. यावेळी राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आणि खातेवाटपाबाबतही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत स्वतः याबद्दल माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की ‘अधिवेशनच्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल’. राज्य सरकारचं अधिवेशन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा शिंदे सरकारचा विचार आहे, त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. पुढे ते म्हणाले, की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मी भेट घेतली. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट झाली. या भेटीनंतर शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रतिक्रिया दिली.
दरम्यान “एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती.” असा दावा सुहास कांदे यांनी केला होता. यावरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की माझी सुरक्षा नाकारण्यासंदर्भात तत्कालीन गृहराज्यमंत्री उत्तर देऊ शकतात. मी कोणालाही घाबरत नाही.
सुप्रीम कोर्टाकडून सरकारवर टांगती तलवार असल्यामुळे मंत्र्यांचे शपथविधी होत नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे, पण एकनाथ शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार आणि सुप्रीम कोर्ट यांचा काही संबंध नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे..