मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा करणारे केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचा आज नरमाईचा सूर पाहायला मिळाला. काल दिवसभराच्या कोर्टकचेरीनंतर नारायण राणे आज मीडियाला सामोरे गेले. यावेळी राणे शिवसेनेवर तुटून पडतील, मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक हल्ला करत नवे बॉम्ब टाकतील असं सर्वांनाच वाटत होतं. पण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख ‘महाशय’ आणि शिवसेनेचा उल्लेख ‘विरोधी मित्रं’ केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं. शिवाय राणेंनी या पत्रकार परिषदेत काहीच नवं भाष्य न केल्यानेही तर्कवितर्क लढवले जात होते.
नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. कालच्या अटक नाट्यानंतर ते शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुखांवर घसरतील असं बोललं जात होतं. पण राणेंचा रोख शिवसेनेपेक्षा मीडियाविरोधातच अधिक राहिल्याचं दिसून आलं. आपल्या राष्ट्राचा अवमान सहन न झाल्याने मी बोललो. त्यात राग येण्यासारखे काही नव्हते. पण, खटला न्यायालयात आहे, त्यामुळे ते वाक्य मी परत उच्चरणार नाही, असं राणे म्हणाले.
1 ऑगस्टला बीडीडी चाळीचं पुनर्बांधणीचा कार्यक्रम होता. त्याअगोदर आमचे आमदार प्रसाद लाड यांनी सेना भवन बद्दल काहीतरी वक्तव्य केलं होतं. आमच्या महिलांवर हात टाकला तर… असं बोलले होते. आपल्या देशाला अभिमान नसेल त्याला राष्ट्रीय सण माहीत नसतात, असं मी म्हणालो होतो. देशाबद्दल अभिमान आहे. त्यामुळे मला सहन झालं नाही. त्यामुळे मी ते बोललो. ते महाशय काय बोलले, म्हणजे मुख्यमंत्री, सेना भवनाबद्दल असं कोणी भाषा करेल तर त्याचं थोबडं तोडा, आदेश दिले. हा क्राईम नाही? 120 बी होत नाही? पत्रकारांनी मला शिकवावं, असं राणे म्हणाले.
या सर्व लढ्यात आमच्या विरोधी मित्राने लढा सुरू केला, असा शिवसेनेचा उल्लेख करतानाच त्यावेळी माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहीला. त्यामुळे मी जेपी नड्डा, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस तसेच सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे. मी असं काय बोललो होतो त्याचा राग आला? ते वाक्य मी परत बोलणार नाही. भूतकाळात एखादी घटना घडली आणि कसा क्राईम होतो? काय पत्रकारिता आहे? आम्ही पाहिलीच नाही. आक्षेप नाही. शिवसेनेच्या नेत्याने असे शब्द उच्चारले नाहीत?, असा सवाल त्यांनी केला.
जनआशिर्वाद यात्रा दोन दिवसांनी पुन्हा चालू होईल. यापुढे आपण जरा जपून पावले टाकू. तसेच चांगल्या शब्दात राज्य सरकारवर टीका करतच राहू, अशी सावध भूमिकाही राणेंनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे राणे बॅकफूटवर गेली काय अशी चर्चा पत्रकारांमध्ये रंगली होती.