आयपीएल 2022 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये डेव्हिड मिलरच्या वादळी खेळीमुळे गुजरात टायटन्सचा विजय झाला आहे. याचसोबत गुजरात टायटन्स आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये प्रवेश करणारी पहिली टीम ठरली आहे. राजस्थान रॉयल्सने दिलेलं 189 रनचं आव्हान पार करायला आलेल्या गुजरातला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 16 रनची गरज होती. डेव्हिड मिलरने प्रसिद्ध कृष्णाच्या 20 व्या ओव्हरच्या पहिल्या तिन्ही बॉलना तीन सिक्स मारून गुजरातला थरारक विजय मिळवून दिला.
डेव्हिड मिलरने 38 बॉलमध्ये 178.95 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 68 रन केले, यामध्ये 5 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. याशिवाय गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने 27 बॉलमध्ये नाबाद 40 रनची खेळी केली. राजस्थानने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातची सुरूवात खराब झाली होती. इनिंगच्या दुसऱ्याच बॉलला ऋद्धीमान साहाला ट्रेन्ट बोल्टने शून्य रनवर आऊट केलं. यानंतर शुभमन गिल आणि मॅथ्यू वेडने गुजरातची इनिंग सावरली. शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड यांनी प्रत्येकी 35-35 रन केले. राजस्थानकडून बोल्ट आणि ओबेड मकॉय यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 188/6 पर्यंत मजल मारली. जॉस बटलरने 56 बॉलमध्ये 89 रन केले, यामध्ये 12 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने 26 बॉलमध्ये 47 रनची आक्रमक खेळी केली.
राजस्थान रॉयल्सचा या सामन्यात पराभव झाला असला तरीही त्यांना फायनलला पोहोचण्याची आणखी एक संधी आहे. बुधवारी आरसीबी आणि लखनऊ यांच्यात एलिमिनेटरचा सामना होणार आहे. या सामन्यात विजयी होणारी टीम राजस्थानविरुद्ध क्वालिफायरचा दुसरा सामना खेळेल. क्वालिफायरच्या या दुसऱ्या सामन्यात जिंकणारी टीम फायनलमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध मैदानात उतरेल. 29 मे रोजी आयपीएलची फायनल होणार आहे.