काही दिवसांपूर्वी पायी वारी काढण्यावर ठाम असलेले ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर मंगळवारी पंढरपुरात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पोलिसांना चकवा देऊन बंडातात्या पंढरपुरात येऊ शकतात, असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर परिसरात पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पंढरपुरात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मानाच्या पालख्या आणि मोजक्या वारकऱ्यांशिवाय इतर कोणालाही पंढरपुरात प्रवेश करण्यास मनाई आहे. त्यामुळे आता बंडातात्या कराडकर नेमके काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
यापूर्वी बंडातात्या कराडकर यांनी पोलिसांना चकवा देत आळंदी ते पंढरपूर पायी वारी काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पुण्यात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर बंडातात्या कराडकर आणि विरोधकांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. आता पुन्हा एकदा बंडातात्या कराडकर यांच्या पंढरपुरात जाण्याच्या शक्यतेमुळे संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे. बंडातात्या कराडकर साताऱ्याहून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते.
हभप बंडातात्या कराडकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. तसेच ते समाज प्रबोधनकारही आहेत. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला होता. यापूर्वी गोहत्या बंदी कायद्यासाठी त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांना अडवलं होतं. गो हत्या बंदी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा रोखण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.