तर प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांना
संधी देऊन सेवा सुरू करू : अनिल परब
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाची कोंडी अद्याप फुटलेली नाही. आंदोलक कर्मचारी मागणीवर ठाम असल्याने, आता राज्य शासनाकडून वेगळ्या पर्यायांचा विचार सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज एक मोठं विधान केलं आहे. अगोदरच्या भरतीमधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार सुरू असल्याचं, अनिल परब यांनी सांगितलं आहे. आंदोलक कर्मचारी कामावर परत आले नाही तर नव्या कामगारांना कामावर घेण्याचे स्पष्ट संकेत परिवहन मंत्र्यांनी दिले आहे.
देशातील सत्ताधाऱ्यांना खड्याप्रमाणे
बाजू करा : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धार्मिक आणि जातीय हिंसाचारावरून केंद्रातील मोदी सरकारवर आणि भाजपावर हल्लाबोल केलाय. देशात सत्ताधारीच जातीयवादाला खतपाणी घालत आहेत. त्यांना खड्याप्रमाणे बाजूला करणं तुमचं आणि माझं कर्तव्य आहे, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसेच आदिवासी कधीही चुकीच्या प्रवृत्तीला साथ देणार नाही ही खात्री असल्याचंही नमूद केलं. ते गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) तालुक्यातील कार्यकर्ता आणि पदाधिकारी बैठकीत बोलत होते.
लपलेल्या ठिकाणाची माहिती द्या,
न्यायालयाचे परमवीर सिंग यांना आदेश
फरार घोषित मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आपल्याविरुद्धच्या गुन्हेगारी खटल्यांमध्ये अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मात्र परमबीर सिंग सध्या कुठे लपलेले आहेत, याची माहिती देत नाही तोपर्यंत त्यांची याचिका स्वीकारण्यास नकार दिला आहे. परमबीर सिंग भारतात आहेत, की परदेशात लपले आहेत, याची माहिती देण्यास सांगितलं आहे. परमबीर सिंग यांच्यावर महाराष्ट्रात जवळपास पाच गुन्हे दाखल आहेत आणि गोरेगाव खंडणी प्रकरणात त्याच्या नावावर अनेक अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत.
राष्ट्रगीत ऐकताना पेटीएमचे
विजय शर्मा झाले भावूक
पेटीएम ही कंपनी गुरुवारी भारतीय शेअर बाजारामध्ये लिस्टेड कंपन्यांपैकी एक झाली. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या मंचावरुन आपलं म्हणणं मांडताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक विजय शेखर शर्मा फारच भावूक झाल्याचं पहायला मिळालं. पेटीएमच्या लिस्टींग समारंभामध्ये भारताचे राष्ट्रगीत वाजू लागल्यानंतर विजय शेखर शर्मांच्या डोळ्यात पाणी आलं.
गांधी वाद्यांवर आरोप करणारे
भित्रे : तुषार गांधी
कंगनाच्या टीकेला तुषार गांधी यांनी लेखाच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. “दुसरा गाल पुढे करण्यासाठी गांधींचा द्वेष करणारे समजू शकतील त्यापेक्षा जास्त हिंमत लागते” असं या लेखाचं शीर्षक आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, “गांधीवादी फक्त दुसरा गाल पुढे करतात असा आरोप करणारे भित्रे असून यासाठी लागणारं धाडस ते समजू शकत नाहीत. हे धैर्य समजून घेण्यास ते असमर्थ आहेत. पण आपण विसरता कामा नये”.
राजस्थान भाजपच्या आमदारांविरोधात
बलात्काराचा गुन्हा
राजस्थानचे भाजपाचे आमदार प्रताप भील यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भील यांच्याविरोधात १० महिन्यांत दुसऱ्यांदा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भील हे राजस्थानच्या गोगुंडा मतदारसंघातून आमदार आहेत. या दोन्ही घटनांमध्ये आमदार भील यांनी महिलांना नोकरी देण्याचे आश्वासन देऊन, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे.
गोलंदाज मोहम्मद आमिरला
करोनाची लागण
पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला करोनाची लागण झाली आहे. आमिरने स्वत: ट्वीट करून माहिती दिली. चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे अबुधाबी येथे होणाऱ्या आगामी टी-१० लीगमध्ये तो भाग घेऊ शकणार नाही. आमिरने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, परंतु पाकिस्तान संघाचे व्यवस्थापन बदलल्यानंतर त्याने पुन्हा पुनरागमनासाठी होकार दिला आहे.
SD social media
9850 60 3590