भीक मागण्यासाठी एका तीन वर्षांच्या मुलीचं पुण्यातून अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर तिला श्रीगोंदा येथे नेण्यात आलं. या घटनेची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ आपला तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही तसेच पिशवीच्या नावावरून आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून पीडित मुलीची सुखरुप सुटका केली.
लग्नात मुलीच्या घरच्यांना हुंडा देण्याची पद्धत आहे. त्यातूनच भीक मागण्यासाठी आणि लग्नात हुंडा मिळविण्याच्या उद्देशाने तीन वर्षाच्या मुलीचे कोरेगाव पार्क परिसरातून अपहरण करण्यात आले होते. अपहरण करुन या चिमुकलीला श्रीगोंदा येथे घेऊन जाणार्या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच अपह्रत मुलीची सुखरूप सुटका केली आहे.
अडीचशे CCTV अन् पिशवीच्या नावावरून छडा
उषा नामदेव चव्हाण (वय 40, रा. कापसे वस्ती, श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. उषा ही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तब्बल पाच दिवस 250 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि हातातील पिशवीच्या नावावरून पोलिसांनी थेट महिलेचे घर गाठले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक 23 वर्षांची महिला फुगे विकते. ती 23 मे रोजी दुपारी दीड वाजता ढोले पाटील रोडवरील एका रिक्षात झोपली होती. त्यावेळी तिच्या 3 वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले होते. तिने दोन दिवस तिचा शोध घेतल्यानंतर मुलगी मिळून येत नाही हे लक्षात आल्यानंतर 25 मे रोजी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती.
घटनेचे गांभिर्य पाहता पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे गतीमान करत परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी महिला अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. 5 दिवसांनी श्रीगोंदा येथून उषा चव्हाण हिला पकडण्यात आले.
उषा चव्हाण हिला दोन मुले व दोन मुली आहेत. तिच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून लग्नात तिने 30 हजार रुपये हुंडा घेतला होता. त्यांच्या समाजामध्ये मुलीचे लग्न करताना मुलाच्या वडिलांकडून हुंडा घेण्याची प्रथा आहे. या कारणासाठी ती लहान मुलीला पळवून नेऊन तिला भिक्षा मागण्यासाठी लावणे तसेच तिचे लग्न करताना हुंडा घेता यावा, यासाठी पळवून आणले होते.