कोकणावर कोरोना आणि वादळ असं दुहेरी संकट आहे. महाविकासआघाडी सरकार वादळग्रस्तांसोबत आहे. येत्या दोन तीन दिवसात पंचनामे पूर्ण होतील. यानंतर कुठे किती आणि कशी मदत करायची हे जाहीर करु,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच “मी हेलिकॉप्टरमधून नाही, तर जमिनीवरुन पाहणी करणार,” असा खोचक टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone) मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (21 मे) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देत आहेत. या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करुन ते जिल्हा प्रशासनाकडून याचा आढावा घेत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही वेळापूर्वी रत्नागिरीत दाखल झाले. मुंबईहून रत्नागिरी येथे पोहचल्यावर प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेतला. येत्या दोन तीन दिवसात पंचनामे पूर्ण होतील. यानंतर कुठे, किती आणि कशी मदत जाहीर करायची हे जाहीर करु. मदतीविना कोणीही वंचित राहणार नाही. नुकसान झालेल्या शेती आणि फळबाग यांचे पंचनामे दोन दिवसांत तातडीने करावेत असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले.
मुख्यमंत्री चार तासांचा दौरा करुन जाणार अशी टीका विरोधकांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावर केली होती. यानंतर मी विरोधकांना उत्तर द्यायला आलेलो नाही, मी कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. मी हेलिकॉप्टरमधून पाहणी करुन गेलो नाही. जमिनीवर उतरलो आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. तसेच दौरा जरी चार तासांचा असला तरी मी फोटोसेशनसाठी आलेलो नाही. मी उत्तम नसलो तरी फोटोग्राफर आहे, असेही ते म्हणाले.
वादळग्रस्तांसाठी जे निकष आहेत ते बदलण्याची तसेच मदत वाढवण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदी व्यवस्थित मदत केल्याशिवाय राहणार नाही. तातडीन नुकसानग्रस्तांना मदत करणं भाग आहे. बदलत्या हवामानामुळे वादळ धडकतायत, वीज पुरवठा खंडीत न होणे यांसह विविध बाबींवर काम करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.