शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी या अनुशंगाने पणन महासंघातर्फे खरेदी-केंद्र सुरु केली जातात. अगदी त्याच पध्दतीने जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे खरेदी केंद्र सुरु करण्याची परवानगी मिळालेली आहे. पण महासंघाच्या आहे त्या गोदामामध्ये यापूर्वीच खरेदी केलेल्या शेतीमालाचा साठा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा माल हलविण्यात आलेला नाही. आणि हेच कारण आहे येथील खरेदी केंद्र बंद असण्याचे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी दराने मका आणि ज्वारीची विक्री करावी लागत आहे. सध्या या तालुक्यात एकही खरेदी केंद्र नसल्याने व्यापारी म्हणतेल त्याच दरामध्ये विक्री केली जाच असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतीमाल केंद्रावर आणण्यापूर्वीच त्याची नोंद घेतली जाते. यासाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नाव नोंदणी करावी लागणार याकरिता 7/12 उतारा, 8 अ, पिकपेरा आणि बॅंकेचे पासबुकची झेरॅाक्स ही खरेदी केंद्रावर जमा करावी लागणार आहे. अशा पध्दतीने रावेर येथील खरेदी संघावर ज्वारीसाठी 256 तर मक्यासाठी 323 शेतकऱ्यांनी नोंद केलेले आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे ती प्रत्यक्ष खरेदी केंद्र केव्हा सुरु होणार याची.
खरेदी केंद्र सुरु करण्यापुर्वीच गोदामाची सोय करणे अपेक्षित होते. मात्र, महसूलच्या पुरवठा विभागाचे कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष राहिलेले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांवर ही सरकारी सोय असताना देखील कमी किंमतीमध्ये शेतीमाल विकण्याची नामुष्की आलेली आहे. गोदामाला जागाच नसल्याने शेतीमाल पडून अशी पहिलीच घटना झाली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासन नेमका काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.
रावेरी तालुक्यासाठी ठरवून देण्यात आलेल्या दोन्ही गोदामात खरेदी केलेल्या हरभऱ्याची साठवणूक केलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गोदामातील माल हलवण्यातच आलेला नाही. त्यामुळेच सध्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. आठवड्याभरात गोदामाची सोय केली जाणार असल्याचे येथील पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे यांनी सांगितले आहे.