1 दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट, मुंबईत पुन्हा कोरोनाची दहशत
देशभरात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्येही पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मंगळवारी कोरोना विषाणूचे 36 रुग्ण आढळले. आदल्या दिवसाच्या तुलनेत दुप्पट ही रुग्णसंख्या होती. यापैकी दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर बाकीच्यांना कोणतीही लक्षणे नसल्यामुळे होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या कोणाच्याही मृत्यूची माहिती नाही. मुंबईत सोमवारी 18 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, गेल्या 14 दिवसांत मुंबईत सक्रिय रुग्णांमध्ये 200 टक्के वाढ झाली आहे. 1 मार्च रोजी मुंबईत 47 सक्रिय रुग्ण होते, तर मंगळवारपर्यंत ही संख्या 144 वर पोहोचली. तज्ञांच्या मते, आजकाल बरेच लोक प्रवास करत आहेत, त्यामुळे कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. तसेच, अॕडेनोव्हायरस आणि H3N2 सारख्या विषाणूजन्य संसर्गामुळे मुंबईतील लोक आजारी पडत आहेत. गेल्या 24 तासांत 1385 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 36 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी 9 महिन्यांनी संपली, निकाल कधी?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर 9 महिन्यांनी संपली आहे. मागचे 9 महिने सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधिशांच्या खंडपीठाने एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, निवडणूक आयोग आणि राज्यपालांच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली. संपूर्ण युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय कधी येणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीच्या अंतिम टप्प्यात सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वाची निरिक्षणं नोंदवली, यामध्ये राज्यपालांनी बोलावलेल्या बहुमताच्या चाचणीवरही कोर्टाने कडक शब्दांमध्ये ताशेरे मारले. तसंच आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचं तोंडी मतही कोर्टानं मांडलं. ठाकरे गटाकडून 9 महिन्यांपूर्वीची परिस्थिती जैसे थे करण्याची मागणी करण्यात आली, पण उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आहे, त्यामुळे आम्ही परिस्थिती जैसे थे कशी करणार? असा प्रश्न सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विचारला.
टाटांचा या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास, कंपनीची जबाबदारी सोपवली; पगार वाचून डोळे होतील मोठे
टाटा ही देशातील सर्वात मोठं मार्केट व्हॅल्युएशन असलेली कंपनी आहे. या कंपनीचे सीईओ एन. चंद्रशेखरन आहेत. ते रतन टाटांच्या खूप जवळचे मानले जातात. बिझनेसची समज, प्लॅनिंग आणि कंपनीबद्दलची आपुलकी यामुळे ते टाटांचे विश्वासू आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून एन. चंद्रशेखरन 128 अब्ज डॉलरची कंपनी सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वात टाटाने 2022 या आर्थिक वर्षात 64267 कोटी रुपयांचं नेट प्रॉफिट मिळवलं आहे. 2017 मध्ये ते 36728 कोटी रुपये होतं. मागच्या पाच वर्षांत टाटा ग्रुपचा रेव्हेन्यू 6.37 लाख कोटींवरून 9.44 लाख कोटींवर पोहोचला आहे. कंपनीची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळणारे एन. चंद्रशेखरन यांचा यात मोठा वाटा आहे.
मी निवृत्ती घेतलीय, सुरेश रैनाने शाहीद आफ्रिदीला केलं ट्रोल
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना त्याच्या खेळासोबतच हजरजबाबीपणासाठी ओळखला जातो. लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये रैनाने पत्रकार परिषदेत जाहीरपणे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीला ट्रोल केलं. आता याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरेश रैनाने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीनंतर काही मिनिटांनी रैनानेसुद्धा निवृत्तीची घोषणा केली होती. जेव्हा रैनाला निवृत्ती मागे घेण्याबाबत प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याने उत्तर देताना आफ्रिदीला ट्रोल केलं.
सुरेश रैना म्हणाला, मी सुरेश रैना आहे, शाहीद आफ्रीदी नाही. मी निवृत्ती घेतली आहे. इतकंच बोलून रैना हसायला लागला. त्यावेळी पत्रकार परिषदेतही हशा पिकला. शाहीद आफ्रिदीने अनेकदा निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पुन्हा पाकिस्तानकडून खेळला. यामुळे त्याच्यावर टीकाही झाली होती.
काँग्रेसच्या आघाडीमध्ये जाण्यात रस नाही; भाजपाविरोधी आघाडीसाठी ‘सपा’ने मांडली वेगळी चूल
२०२४ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसला वगळून भाजपाविरोधी राष्ट्रव्यापी आघाडी बनविण्यासाठी समाजवादी पक्ष प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेची दोन दिवसांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याआधी २०१२ साली समाजवादी पक्षाने कोलकाता येथे अशीच बैठक घेतली होती. या वेळी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे पश्चिम बंगालमधील भाजपाविरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतील, अशी माहिती समाजवादी पक्षाच्या नेत्याने दिली. १७ मार्च रोजी दुपारी पाच वाजता अखिलेश यादव आणि सपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि बंगालमधील सपाचे नेते किरणमॉय नंदा हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. अखिलेश यादव आणि बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश राज्यांत २०२१ आणि २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांना मदत केली होती.
SD Social Media
9850 60 3590