भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि निर्णायक टेस्ट आता आठवडाभरावर आली आहे. त्याचवेळी भारतीय टीमला मोठा धक्का बसलाय. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी त्याची रॅपीड अँटीजन टेस्ट झाली. त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. रोहित लीस्टरशायर विरूद्ध झालेल्या चार दिवसीय मॅचमध्ये खेळत होता. तो तिसऱ्या दिवशी बॅटींगला उतरला नाही. त्याच्या जागेवर श्रीकर भरतनं ओपनिंग केली. पहिल्या इनिंगमध्ये रोहितनं 25 रन काढले होते.
टीम इंडियाला धक्का
भारतीय टीम 1 जूलैपासून इंग्लंड विरूद्ध टेस्ट मॅच खेळणार आहे. टीमचा नियमित ओपनर केएल राहुल दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यावर आलेला नाही. त्यातच रोहितला कोरोनाची लागण झाल्यानं टीम इंडियाला धक्का बसलाय. गेल्या वर्षी कोरोनाच्या धोक्यामुळेच इंग्लंड दौऱ्यातील पाचवी आणि शेवटची टेस्ट स्थगित करावी लागली होती.
रोहितनं गेल्यावर्षी इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाकडून सर्वाधिक रन केले होते. त्यानं चार मॅचमध्ये एका शतकासह 368 रन केले. त्याची सरासरी 52.27 होती. टीम इंडिया या सीरिजमध्ये 2-1 नं पुढे आहे. 2007 साली भारतीय टीमनं इंग्लंडमध्ये शेवटची टेस्ट सीरिज जिंकली होती. 15 वर्षानंतर भारताला सीरिज जिंकण्यासाठी फक्त ड्राॕ ची गरज आहे. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी देखील ही टेस्ट खूप महत्त्वपूर्ण आहे.
‘टीम इंडियाचा मुख्य स्पिनर आर. अश्विनलाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो अन्य खेळाडूंसह लंडनला गेला नव्हता. आता अश्विन बरा झाला असून तो पहिल्या टेस्टमध्ये खेळण्याची शक्यता आहे. माजी कॅप्टन विराट कोहलीलाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. विराटही कोरोनामधून बरा झाला असून तो सराव सामन्यात खेळत आहे.