राज्यात एकीकडे सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणतेही विघ्न घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा हायअलर्ट झाली आहे. मात्र अशातच राजकीय तणावपूर्ण वातावरणात जालना शहरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत विविध प्रकारच्या 9 धारदार तलवारी आढळून आल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वाल्मिकनगर परिसरात छापा मारून पोलिसांनी तलवारीचा मोठा साठा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई केली होती.शहरातील अवैध शस्त्र शोधण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने तीन वेगवेगळे पथक तयार करून त्याद्वारे शोध मोहीम सुरू केले. दरम्यान, विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी वाल्मीक नगर येथील शेख कलीम शेख शरीफ याच्या घरी छापा मारला. यावेळी घरात एका लोखंडी पेटीत वेगवेगळ्या आकाराच्या 9 धारदार तलवारी सापडल्या.
सदर तलवारी मंगलबजार येथील आफ्रोज हाफिज पठाण यांच्या मार्फत खरेदी केल्याचे चौकशीत समोर आले. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.