घाण निघून गेली, आता जे काही होणार चांगलंच होणार : आदित्य ठाकरे

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. गेल्या दोन-चार दिवसांपासून शिवसेनेत उत्साहाचं वातावरण आहे. कारण आता घाण निघून गेलीय. यापुढे जे काही होणार ते चांगलंच होणार, अशा खोचक शब्दांमध्ये आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“कार्यकर्त्यांचा हा उत्साह बघितल्यानंतर मला तोच दिवस आठवतो जेव्हा मी माझी उमेदवारी जाहीर केली होती. माझा आवाज जरी इथपर्यंतच हॉलमध्ये येत असला तरी तुमचा आवाज गुवाहाटीपर्यंत पोहोचला आहे. भास्कर जाधव यांनी सांगितलं की, मुंबई आणि मुंबई महापालिकेवर सगळ्यांचा डोळा आहे. भास्करराव तुम्ही बरोबर बोललात की, मुंबईवर भाजपचा डोळा आहे. मुंबईत एवढे वर्ष आपण शिवसेना म्हणून राहिलो आहेत जरी मुंबईवर कुणाचा डोळा असला तरी आपण मुंबईला कुणाची नजर लागू दिलेली नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“आज इथे उपस्थित झाल्यानंतर मी बोललो की ज्यांनी हाऊसमध्ये ताकद दाखवली तो आवाज भास्करराव आमच्या बाजूला बसले आहेत. सचिन अहिर, महापौर आहेत. खासदार आले तेव्हा चौधरींना मी मध्ये घेतलं आहे. पळत होते म्हणून नाही तर मी नुसतं मध्ये ठेवलं. त्यांना मी तेच बोललो. नाहीतर तुम्हाला वाटेल की, आम्ही पकडून ठेवतोय. गेले दोन-चार दिवस शिवसैनिकांमध्ये जे वातावरण आहे, सगळीकडे जोश आणि जल्लोष दिसतोय. घाण निघून गेली आहे. आता सर्व चांगलंच होणार”, अशा खोचक शब्दांमध्ये आदित्य ठाकरेंनी टीका केली.

“एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. हैराण देखील होतो. पण ठिक आहे, राजकारण म्हटल्यानंतर लोकं कशी बदलू शकतात हे आपण अनेक वर्ष बघितलं आहे. पण हाच प्रश्न सतावतो की आपण या लोकांना कधी कमी केलं आणि काय कमी दिलं? कित्येक लोकांवर अन्याय झाला. हे आता दिसून येतंय. कालपण कल्याण-डोबिंवलीवरुन कार्यकर्ते आले की त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू दिलं गेलं नाही. मातोश्रीवर आल्यावर त्यांचे फोन यायचे की तुम्ही तिथे का गेले म्हणून. हे आम्ही दुर्लक्ष केलं. आज पक्षप्रमुखांनी देखील हे सांगून दाखवलं”, असं आदित्य म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.