भारतीय संघानं विजयानं ट्वेंटी -२० वर्ल्ड कप स्पर्धेचा निरोप घेतला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळणाऱ्या टीम इंडियानं सोमवारी ग्रुप २ मधील अखेरच्या साखळी सामन्यात नामिबियावर दणदणीत विजयाची नोंद केली.
आर अश्विन व रवींद्र जडेजा यांच्या दमदार कामगिरीनंतर रोहित शर्मानं चांगली फटकेबाजी केली. नशीबाचीही रोहितला बरीच साथ मिळाली. रोहित व लोकेश राहुल यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना टीम इंडियाला सहज विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या नामिबियानं धक्के बसूनही २० षटकं खेळून काढताना ८ बाद १३२ धावा केल्या. आर अश्विन ( ३-२०) व रवींद्र जडेजा ( ३-१६ ) यांनी दमदार कामगिरी केली. रोहित शर्मानं भन्नाट कॅच घेतला. जसप्रीत बुमराहनं १९ धावांत २ विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी ( ३९ धावा) व राहुल चहर ( ३० धावा) हे महागडे गोलंदाज ठरले. डेव्हिड विज ( २६) व स्टीफन बार्ड ( २१) यांनी संघर्ष दाखवला.
प्रत्युत्तरात रोहित व लोकेश राहुल यांनी वेगवान सुरुवात केली. रोहितनं या सामन्यात चौकार-षटकार खेचून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३०००* धावांचा टप्पा ओलांडला. विराट कोहली ( ३२२७) आणि मार्टीन गुप्तील ( ३११५) यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा रोहित तिसरा फलंदाज ठरला. कसोटी, वन डे व ट्वेंटी-२० या तिन्ही फॉरमॅटमध्ये ३०००+ धावा करणारे विराट व रोहित हे दोनच फलंदाज आहेत. रोहितची फटकेबाजी पाहताना राहुल दुसऱ्या बाजूनं संयमी खेळी करत होता. या दोघांनी सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी भागीदारी केली आणि त्यात रोहितच्या ३९ धावा होत्या. रोहित ३७ चेंडूंत ७ चौकार व २ षटकार मारून ५६ धावंवर माघारी परतला.
रोहित बाद झाल्यावर लोकेश राहुलची फटकेबाजी केली. राहुलनं ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. राहुल ३६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ५४ धावांवर नाबाद राहिला. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या सूर्यकुमार यादवनं १९ चेंडूंत नाबाद २५ धावा केल्या. टीम इंडियानं १५.२ षटकांत १ बाद १३६ धावा केल्या.