भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला मोठा धक्का बसला. भारतीय संघाचा यष्टिरक्षक ऋद्धिमान साहा दुखापतग्रस्त झाला असून तो मैदानावर आला नाही. त्याच्या जागी श्रीकर भरतने यष्टिरक्षणाची जबाबदारी घेतली.
बीसीसीआयने सांगितले की, साहाला मानेचा त्रास आहे आणि त्यामुळेच शनिवारी तिसऱ्या दिवशी तो मैदानात उतरला नाही. बीसीसीआयने सांगितले की, वैद्यकीय पथक साहाची काळजी घेत आहे.
बीसीसीआयने सांगितले की, “ऋद्धिमान साहाला मानेचा त्रास आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. त्याच्या अनुपस्थितीत केएस भरत यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडणार आहे.
साहाच्या दुखापतीमुळे भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे. साहाची दुखापत किती गंभीर आहे आणि तो किती दिवसांत बरा होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशा परिस्थितीत तो फलंदाजीसाठी तंदुरुस्त होईल की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. साहाने फलंदाजी केली नाही तर भारतासाठी ते अडचणीचे ठरू शकते. भारताला एका फलंदाजाचा तोटा सहन करावा लागू शकतो. साहा पहिल्या डावात केवळ एक धाव करुन बाद झाला होता.
भारतीय संघाला पहिल्या डावात 345 धावांवर रोखल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने धमाकेदार सुरुवात केली होती. न्यूझीलंडने काल एकही गडी न गमावता 57 षटकांमध्ये 129 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगलंच पुनरागमन केलं. भारतीय गोलंदाजांनी किवी संघाचा डाव 142.3 षटकांमध्ये 296 धावांवर रोखला. त्यामुळे टीम इंडियाला 49 धावांची नाममात्र आघाडी मिळाली आहे.
न्यूझीलंडच्या सलामीवीरांव्यतिरिक्त एकाही किवी फलंदाजाला मोठी खेळी उभारता आली नाही. आज सकाळच्या सत्रात रवीचंद्रन अश्विनने आक्रमक विल यंग याला 89 धावांवर असताना बाद करत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यंगने 214 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने ही खेळी उभारली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने एकेका किवी फलंदाजाला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. याचदरम्यान, खेळपट्टीला चिकटून बसलेल्या टॉम लॅथम याला अक्षर पटेलने बाद केलं. लॅथमने 282 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 95 धावांची खेळी केली. तर कर्णधार केन विलियम्सन (18), रॉस टेलर (11), हेन्री निकोलस (2), टॉम ब्लंडेल (13), रचिन रवींद्र (13) हे फलंदाज केवळ हजेरी लावून गेले. तसेच गोलंदाजांनादेखील काही चांगली कामगिरी करता आली नाही. काईल जेमिसनने 23 धावांचं योगदान दिलं.