खाद्यभ्रमंती : 2.
भुसावळ..भारतामधील एक महत्वाचे रेल्वे जंक्शन तसच एम.पी.च्या बाँर्डरवरच गांव ,त्यामुळे तिथल्या खाण्यावर देखील एम.पी.चा प्रभाव.तसा तो स्टेशनच्या बाहेर पडल्यावरच जाणवायला सुरुवात होते.नानाविविध खानावळी..जसे कि आर्यनिवास भोजनालय ,अग्रवाल भोजनालय ,कैलास रेस्टाँरंट ,पप्पुशेठचा पंजाबी ढाबा असे अनेक एकापेक्षा ठिय्ये दिसायचे.आर्यनिवासमध्ये तुम्ही गेलात कि स्वच्छ सुंदर अशी थाळी समोर यायची त्यात ठरलेल्या जागी लोणच ,पापड,चटणी,कांदा असायचा,एका वाटीत कढी,एकात चवळी किंवा तसल्याच कडधान्याची उसळ ,भाताची मुद ,त्यावर पिवळे वरण व गरमागरम फुलके. अप्रतिम उसळ गरम तुप लावलेल्या फुलक्याबरोबर काय लागायची सोबत भुरकायला गोडआंबट कढी..हे सर्व चुलीवरच असायच ,’चुलीवरच’ अस विशेष सांगायच म्हणजे आजकाल जे चुलीवरच हे ,चुलीवरच ते ,हे जे काय चाल्लय , ते आमच्यावेळेस आधीपासुनच होत..तिथुन थोड पुढ आल कि पप्पु शेठचा ढाबा लागायचा, हाँटेल कन्हैयाकुंजच्या अलिकडे ,तिथली दाल फ्राय व तंदूर रोटी अप्रतिम.नेहमी असते तशी पिवळी नव्हे तर गर्द लाल रंगाची उडिद व चणा डाळीची अस्सल पंजाबी तडक्याची झणझणीत दालफ्राय ,जोडीला पापड ,लोणच,पुदिन्याची चटणी असा मोठा झकास बेत असायचा, भल्यामोठ्या तंदूरजवळच जवळपास तेवढ्याच आकाराचा पप्पुशेठ कडक रोट्या काढण्यात मग्न असायचा..आँर्डर ,गि-हाईकाचे बिलिंग सबकुछ तेच असायचे,क्वचितप्रसंगी त्यांची आई गल्ल्यावर दिसायची..इथली दालफ्राय ज्याने एकदा चाखली तो परत तिथे येणार म्हणजे येणारच..नंतर पोस्टआँफिसजवळ गरम दूध देणार एक दुकान होत ,भल्यामोठ्या कढईत घट्ट दूध उकळत ठेवलेल असायच आणि किंमत फक्त 5/- रु. ग्लासभर दूध त्यावर जाडसर मलई ..हे पिण्यासाठी संध्याकाळपासुन तिथे गर्दि व्हायची.त्यावेळेस आमच्या संध्याकाळच्या पेयपानाच्या उड्या ह्या इतपतच होत्या. नंतर गांधी चौकात राधेश्याम महाराजांची चाटची गाडी.. ती संध्याकाळी लागायची.त्यांच्याकडे आलुटिक्की मिळायची तिथे त्याला पँटिस म्हणायचे ,भलीमोठा स्टिलचा तवा ,मधोमध देसी घी व तव्याच्या कडेला गोलाकार रचलेले टिक्किचे तांबुस गोळे .आपण पँटिस मागितले कि महाराज त्यातला एक गोळा त्या देसी घीमध्ये तळायला घ्यायचा ,चांगला दाबुन दाबुन चपटा करत त्याला खरपुस तळायचे ,तळुन झाला कि त्यावर मसाला छोले घालुन वर किसलेला कांदा आणि पुदिन्याची व चिंचेची गोड चटणी, अस सजवुन आपल्या हातात ती प्लेट यायची.घासागणिक स्वर्ग काय असतो हे प्रत्यक्ष ते पँटिस खाल्याशिवाय कळणार नाही..आता ते महाराज गाडी लावतात कि दुकान टाकलय माहीत नाही…त्याच्याकडचे देसी घी चे गुलाबजाम हे देखील सुंदर असायचे ,साईज म्हणाल तर छोटी मोसंबीच एवढे ते मोठे गुलाबजाम..त्यांच्या शेजारीच कुल्फीच्या गाड्या असायच्या ..सर्वात अधिक किंमत म्हणजे 2/- रु. कारण सुरूवातच चार आण्यांपासुन व्हायची..महाराजांचे पँटिस खाल्यावर ती कुल्फी खाणे हा अलिखित नियमच होता..समोरच बाटाचे शोरुम होते..तिथ खरेदी करण म्हणजे आजच्या मोची , रेड टेप,किंवा तत्सम शोरुममध्ये जाण्याइतपत भारी होत..तिथे खरेदि करायची आणि समोर हि मेजवानी झोडायची हि त्यावेळच्या सुखाची परमावधी होती..बाटाच्या शेजारीच दर्शन आईसक्रिम होत त्यावेळेच टिपटाँप, तिथे ज्युस पण मिळायचा,समोर शर्मा स्वीट्स नावाच मिठाईच दुकान होत तिथला उपवासाचा चिवडा बेस्ट..स्टेशनपासुन सुरू आलेली आपली खाद्ययात्रा गांधीचौकापर्यंत येवुन पोहोचलीय..पुढच्या भागात अजुन नविन काहीतरी आठवेलच..जाता जाता आज का ग्यान : मोजकच खा पण चवीच खा..😊
© सारंग जाधव 9822936123