नाशिकमध्ये 3 ते 5 डिसेंबर दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या याच तारखांदिवशी नाशिकमध्ये विद्रोही साहित्य संमेलन घेण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी गुलाम शेख यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्वागताध्यक्ष शशी उन्हवणेसह राजू देसले, डॉ. अनिल सोनवणे, चंद्रकांत भालेराव, डॉ. भारत कारिया यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. त्यानंतर विद्रोही साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली. विद्रोही साहित्य संमेलनासाठी नाशिक मर्चंट बँकेत खाते उघडल्याचे सांगण्यात आले आहे. या संमलेनाच्या जागेत स्टॉल्स उभारणीसाठी तीन हजार रुपये शुल्क घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. संमेलनाविषयी माहिती देताना नीलिमा पवार म्हणाल्या की, 15 वे विद्रोही मराठी साहित्य संमेनल केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात होणार आहे. मराठा विद्याप्रसारक संस्थेला छत्रपती शाहू महाराजांनी भेट दिली होती. या भेटीला एकशे एक वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे हे संमेलन केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात होत आहे.
औरंगाबादचे चित्रकार राजानंदर सुरडकर यांनी या संमेलनाचे बोधचिन्ह तयार केले आहे. या बोधचिन्हात प्रतिकात्मक सूर्य आहे. लेखणीतून एक पिंपळपान उगवले आहे. हे पिंपळपान महाकवी वामनदादा कर्डक, आंबेडकरी साहित्यिक बाबूराव बागुल यांचे प्रतीक आहे. आदिवासी उलगुलानसाठी एक महिला नगारा वाजवत आहे. बोधचिन्हावर नांगर आहे. त्या नांगराने गुलामीच्या बेड्या तोडल्या आहेत. शेतकरी आंदोलन आणि साहित्याचे ते प्रतीक आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान, नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीलाही वेग आला आहे. आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये त्याची जय्यत तयारी सुरू आले. तब्बल 7000 जण बसतील इतक्या आसन क्षमतेचा सभामंडप बांधण्यात येत आहे. याठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अनेक नामांकित अतिथी येणार आहे. तसेच 3 दिवस मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.