पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (१३ फेब्रुवारी) विधानसभेत बोलताना २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाला हरवण्याच्या त्यांच्या आव्हानाचा पुनरुच्चार केला. त्या म्हणाल्या की, देशातली अराजकता कमी करण्यासाठी लोकांचं सरकार आणण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच बंगालमधील हिंसाचार आणि भ्रष्टाचारावरून भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेल्या टीकेला देखील त्यांनी उत्तर दिलं.
विधानसभेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बंगालमध्ये देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे. परंतु राज्याच्या सीमावर्ती भागात बीएसएफने म्हणजेच सीमा सुरक्षा बलाने (Border Security Force) दशहत माजवली आहे. सीमावर्ती भागात निर्दोष लोक मारले जात आहेत. परंतु या हत्यांच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने साधी चौकशी समिती नेमण्याचीदेखील तसदी घेतली नाही.
पश्चिम बंगालच्या विधानसभेत गदारोळ
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपा सरकार इतक्या खालच्या पातळीवर गेली आहे की, त्यांनी नोबेल पारितोषिक विजेत्या आमर्त्य सेन यांचा पण अपमान केला. दरम्यान, सोमवारी बंगालच्या विधानसभेत मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांना विधानसभेचे अध्यक्ष बिमान बोस यांनी त्यांचे भाषण पूर्ण करण्यापासून रोखल्या त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला. त्यानंतर काही वेळाने सभागृहाचे कामकाज सुरू झाले पण यावेळी त्यांनी राज्यपालांवर टीका केली.