पुण्यात महाविकासआघाडीच्या कसबा पॅटर्नमुळे भाजपचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कारण आगामी पालिका तसंच विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपविरोधात महाविकासआघाडीने अशीच एकजूट दाखवली तर पुण्यातील भाजपचे आमदार असलेले कॅन्टोमेंट, शिवाजीनगर आणि खडकवासला हे तीन मतदारसंघ आत्ताच डेंजरझोनमध्ये गेल्याचं दिसत आहे.
पुण्यात भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला कसबा महाविकासआघाडीने धंगेकरांच्या रूपाने काबिज केल्याने महाविकासआघाडीच्या आशा चांगल्याच पल्लवीत झाल्या आहेत. भाजपविरोधात आपण एकदिलाने लढलो तर नक्कीच जिंकू शकतो, हा दांडगा आत्मविश्वास महाविकासआघाडीच्या नेत्यांना आत्तापासूनच वाटू लागलाय. गेल्यावेळी अवघ्या पाच हजाराने पराभूत झालेले काँग्रेसचे माजी मंत्री पुणे कॅटोन्मेंट मतदारसंघातून आत्तापासूनच कामाला लागलेत. शिवाजीनगर आणि कॅन्टोंमेंटची जागा 2024 ला आम्ही जिंकणारच, असा दावा ते आत्तापासूनच करू लागलेत. कारण या दोन्ही जागा काँग्रेसनं गेल्यावेळी अवघ्या 5 हजार मतांच्या फरकाने हरल्यात.
2019 ला राष्ट्रवादीची खडकवाल्याची जागा तर अवघ्या 2595 मतांनी हरलीय, त्यामुळे यावेळी ही जागा आम्ही काहीकेल्या जिंकणारच कारण दोन्ही काँग्रेससोबत शिवसेनेची मतंही यावेळी महाविकासआघाडीमध्ये ऍड झाली आहेत, तसंच वंचितही सेनेसोबत आहे, म्हणूनच 2024 साली पुण्यात भाजपसाठी अतिशय निराशाजनक चित्र असेल, असं राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आत्तापासूनच ठामपणे सांगत आहेत.
भाजपने मात्र महाविकासआघाडीच्या या कसबा पॅटर्नवरच आक्षेप घेतला आहे. तिथे महाविकासआघाडीचा नाहीतर उमेदवार धंगेकरच जिंकलाय त्यामुळे विरोधकांनी फार हुरळून जाऊ नये, असा पलटवार भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळिक यांनी केलाय.
पुण्यात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी 5 भाजप, राष्ट्रवादी 2 आणि आता कसब्याच्या रूपाने काँग्रेसचाही एक आमदार निवडून आलाय. म्हणूनच मविआचा हा कसबा पँटर्न भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकतोय, असं राजकीय अभ्यासकांना वाटतंय.पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या शिंदेसेनेची राजकीय ताकद मर्यादित असल्याने भाजप विरूद्ध महाविकासआघाडी अशा थेट लढतीत सध्यातरी विरोधकाचं पारडं किंचित जड वाटतं असलं तरी आंबेडकरांची ‘वंचित’ एनवेळी काय भूमिका घेते यावरूनही बरिचशी गणितं बदलणार आहेत. चिंचवडमधेही त्याची झलक पहायला मिळाली आहे. आता दोन्ही काँग्रेस वंचितशी कसं जुळवून घेतात यावरही बरीचशी राजकीय गणितं निश्चित होणार आहेत.