कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने रेल्वेला दिलेला स्पेशल गाड्यांचा दर्जा काढला आहे. काही मार्गांवरून पॅसेंजर गाड्यादेखील धावू लागल्या आहेत . या सगळ्यात जनरल तिकीटाची विक्री सुरु करत प्रवाश्यांना जनरल डब्यातून प्रवासास देखील परवानगी मिळण्याची आशा होती. मात्र ती आशा फोल ठरली आहे. रेल्वे प्रशासनाने अद्यापही जनरलसाठीची तिकीट सुरु केलेली नाही. त्यामुळे प्रवाश्यांना जनरल डब्यांतला प्रवास आरक्षण तिकीट काढून करावा लागणार आहे.
पुणे- झेलम जम्मू तावी एक्स्प्रेस, पुणे- दानापूर एक्स्प्रेस, पुणे- नागपूर एक्स्प्रेस, पुणे- बिलासपूर, पुणे- हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे- हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेस, पुणे- गोरखपूर, पुणे- पटना एक्स्प्रेस आदी गाड्या पुणे स्थानकावरून धावत आहेत.
रेल्वे प्रशासनाने रेल्वेचा विशेष दर्जा काढला असला तरी जनरल तिकीट विक्री बंद आहे, त्यामुळे प्रवाशांना आरक्षित तिकीट काढूनच प्रवास करावा लागत आहे. सर्वच प्रकारच्या दर्जासाठी आरक्षित तिकीट अनिवार्य आहे. त्याशिवाय प्रवास करता येत नाही.त्यामुळे जनरलसह वातानुकूलित सर्वच डब्यातून प्रवास करताना आरक्षित तिकीटाची परवानगी आवश्यक आहे. दुसरीकडे प्रवासात फुकटे प्रवाशी ही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक प्रवासी जाणीवपूर्वक तिकीट न घेता कोणत्याही डब्ब्यात शिरून प्रवास करताना दिसून येत आहे.