केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. यावरुन आता शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून थेट निवडणूक आयोगावरच निशाणा साधला आहे. हा लोकशाहीचा मुडदा पाडण्याचाच प्रकार असून अंधेरी निवडणुकीसाठी आयोगाने केलेली ही मॅचफिक्सिंग असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे.
सामनाच्या अग्रलेखात काय?
केंद्रीय निवडणूक आयोगाने फक्त चार तासांच्या बैठकीत धक्कादायक निर्णय घेतला आणि शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्हच गोठवले. आयोग एवढय़ावरच थांबला नाही, तर शिवसेना हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करणारा अंतरिम आदेशही शिवसेनेसह शिंदे गटाला दिला. हे दोन्ही निर्णय अंधेरी पोटनिवडणुकीसाठी असल्याचे आयोगाने म्हटले आहे. सोमवारपर्यंत पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह सुचवावे, असे निर्देशही आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. हा तर लोकशाहीचा मुडदा पाडण्याचाच प्रकार असून अंधेरी निवडणुकीसाठी आयोगाने केलेली ही मॅचफिक्सिंग असल्याची संतप्त प्रतिक्रिया जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.
शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटाकडून अंधेरी पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण हे चिन्ह मिळावे असा दावा करणारी याचिका निवडणूक आयोगापुढे करण्यात आली होती. यासंदर्भात शिवसेना तसेच शिंदे गटाला शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश आयोगाने दिले होते. त्यानुसार दोन्ही बाजूंकडून शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा सांगणारी कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. यानंतर निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत पेंद्रीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक दिल्लीत पार पडली. सुमारे चार तास झालेल्या या बैठकीनंतर शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह तात्पुरते गोठविण्याचा अंतरिम निर्णय घेण्यात आला.