आज दि. १५ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

पहिली लाट आल्यानंतर आपण
काहीसे गाफील राहिलो : मोहन भागवत

जगभरात करोनाची परिस्थिती अजूनही आटोक्यात येत नसताना भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तीव्र तडाखा बसला आहे. रुग्णसंख्येसोबतच दिवसेंदिवस करोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणेसोबतच प्रशासनासमोर देखील मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी करोनासंदर्भात जनतेला आवाहन केलं आहे. त्यासोबतच, देशावर ओढवलेल्या करोनाच्या संकटाविषयी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “पहिली लाट आल्यानंतर आपण सगळे काहीसे गाफील झालो. म्हणून हे संकट उभं राहिलं. आता काळजी घेण्याची गरज आहे.

राज्यांना दिलेल्या व्हेंटिलेटरचे
ऑडिट करण्याचे आदेश

देशातील करोनाचं संकट पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. या बैठकीत करोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच देशातील लसीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मंत्रालयातील मंत्री आणि अधिकारी यांचा सहभाग होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राकडून राज्यांना देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरबाबतचे प्रश्न गंभीरतेने घेतले आहेत. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

तौते चक्रीवादळाचा तडाखा;
केरळमधील जनजीवन विस्कळीत

तौते चक्रीवादळाने हळूहळू रौद्र रुप धारण करण्यास सुरूवात केली आहे. सुरूवातीच्या टप्यात दक्षिण पूर्ण अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळ निर्माण झालं. मात्र, आता त्याचं रुपांतर चक्रीवादळात झालं असून, केरळ, तामिळनाडूमध्ये त्याचा तडाखा जाणवण्यास सुरूवात झाली आहे. केरळमधील किनारपट्टी भागातील जनजीवन विस्कळीत झालं असून, अनेक घरांचं नुकसान झालं आहे. झाडं कोसळली असून, अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. केरळातील मालापूरम कोझीकोडे, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वादळाचा तडाखा गुजरातसह
महाराष्ट्रालाही बसणार

दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेलं ‘तौते’ चक्रीवादळ अधिक सक्रिय झालं असून, गुजरातच्या दिशेनं सरकत आहे. त्यामुळे सर्वच यत्रंणा सर्तक झाली आहे. या वादळाचा तडाखा गुजरातसह महाराष्ट्रालाही बसणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. समुद्रातून हे वादळ गुजरातच्या दिशेनं सरकण्यास सुरूवात झाली असून, येत्या काही तासांत कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

महामारीबाबत जागतिक आरोग्य संघटनेने
आधीच इशारा देणे अपेक्षित होते

महामारीपासून सुरक्षिततेसाठी आणि तयारी करण्यासाठी गठित झालेल्या एका स्वतंत्र आंतरराष्ट्रीय पॅनलने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. जागतिक पातळीवर कोविडविरोधातील व्यवस्थेत अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे नवीन पारदर्शक व्यवस्था उभारण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. जीवघेणा कोरोना विषाणूविरोधात लढताना ताळमेळाचा अभाव होता. तसेच गंभीर इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महामारीबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून आधीच इशारा देणे अपेक्षित होते. एकामागून एक खराब निर्णय घेण्यात आल्यामुळे कोरोना विषाणूने जवळपास ३३ लाख लोकांची बळी घेतली आहे.

आरोग्य विद्यापीठाच्या विविध
परीक्षांबाबत फेरप्रस्ताव पाठवा

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध १ जून पर्यंत वाढविले असल्याने आरोग्य विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या २ जून पासून सुरु होणाऱ्या परीक्षांबाबत चर्चा करुन फेरप्रस्ताव शासनास पाठवावा असे निर्देश विद्यापीठाचे प्रति कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले. -कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षांच्या वेळापत्रकांबाबत आढावा बैठक ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाली.

ऑक्सिजनच्या बाबतीत स्वावलंबी
बनविण्याच्या दिशेने वाटचाल

राज्य ऑक्सिजनच्या बाबतीत स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. या मिशनमध्ये राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील ८ अधिकाऱ्यांच्या टास्क फोर्सची कामगिरी उल्लेखनीय आहे. आतापर्यत ५००० कोटी लिटर ऑक्सिजन वितरीत केले.

आवश्यक असणारा ऑक्सिजन त्या
जिल्ह्यातच निर्माण होईल यावर भर द्यावा

जिल्ह्यात आवश्यक असणारा ऑक्सिजन त्या जिल्ह्यातच निर्माण होईल यावर भर द्यावा आणि पन्नासहून अधिक बेड असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प अनिवार्य करावा अशा सुचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पात उभारण्यात आलेल्या राज्यातल्या पहिल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन शुक्रवारी ते दूरदृश्य प्रणालीव्दारे बोलत होते. ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याबाबत गडकरी यांनी सुचना केल्या.

खासदार राजीव सातव यांची
प्रकृती खालावली

कोरोनामुक्त झालेले काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली असून त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. सातव हे राहुल गांधी यांचे विश्वासू नेते आहेत. सातव यांची १९ दिवसाच्या उपचारानंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले होते. त्यांची अचानक तब्येत खालावली त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे.

दोन डोसमधील अंतर वाढवून
ब्रिटनने वाचवले ४२ हजार ज्येष्ठांचे प्राण

कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचे धोरण अवलंबुन ब्रिटनने आतापर्यंत ४२ हजार ज्येष्ठांचे प्राण वाचवले आहेत. नॅशनल हेल्थ इंग्लंडने शुक्रवारी लसीकरणातून होणाऱ्या संसर्गाचा थेट लाभ जाहीर केला. यूकेमध्ये १२ आठवड्यांच्या अंतराने दोन अँटी कोरोनरी लसचे डोस दिल्या जात आहेत, त्यामुळे जलद संसर्ग दर कमी झाला आहे. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना मोठा दिलासा : नॅशनल हेल्थ इंग्लंडच्या आकडेवारीनुसार ६५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या ११,७०० लोकांचे जीव वाचविण्यात या लसीच्या पहिल्या डोसची मोठी भूमिका होती.

इटलीने ठोठावला गुगल
कंपनीला ९०४ कोटी रुपयांचा दंड

गुगलने प्रतिस्पर्धाविरोधी धोरण स्वीकारल्याचे दोषी मानून कंपनीवर ९०४ कोटी रुपयांचा दंड इटलीने ठोठावला आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनचा पत्ता सांगणार्या एका सरकारी मोबाईल अॕपला आपल्या अँड्रॉइड ऑटो व्यसपीठ उपलब्ध करून न दिल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.
कंपनीने या जूसपासला अँड्रॉइड ऑटोवर तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश इटलीच्या प्रतिस्पर्धा आणि बाजार ऑथोरिटीने (एजीसीएम) गुगलला दिला आहे. प्रत्येक दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉइडला मिळालेल्या एकाधिकाराचा दुरुपयोग करून गुगलने स्पर्धा संपविण्याचा प्रयत्न केल्याचे एजीसीएमने म्हटले आहे.

मराठा समाजाला 3 हजार
कोटींचं पॅकेज जाहीर करा

मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला 3 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात यावं, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आणि ओबीसींसाठी जाहीर केलेल्या सवलतीही लागू करा, अशी मागणी केली आहे.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी
विश्वास पाटील यांची निवड

अत्यंत चुरशीची वाटणारी पण सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाने एकहाती जिंकलेल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीनंतर, आता अध्यक्षपदाची निवड झाली आहे. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली. विश्वास पाटील हे अनुभवी संचालक आहेत.

कोरोना नियंत्रणात
मोदी सरकार अपयशी

मोदी सरकारच्या कोरोना नियंत्रणातील अपयशावर जगभरातून टीका होत आहे. आता प्रसिद्ध जागतिक वैद्यकीय संशोधन नियतकालिक लॅन्सेटने देखील मोदी सरकारच्या कोरोना नियंत्रणातील अपयशावर बोट ठेवत कान टोचले आहेत. मोदी सरकार कोरोना नियंत्रणावर भर देण्यापेक्षा सरकारवरील ट्विटरवरील टीका दडपण्यासाठीच अधिक प्रयत्न करत असल्याची कोपरखळीही या लेखात मारण्यात आलीय.

कोविशिल्ड लसीच्या 50 लाख
डोसची ब्रिटनवारी थांबवली

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भयंकर कहर रोखणे हे मोठे आव्हान सध्या भारतापुढे उभे राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील कोरोना लसीकरण मोहिमेला गती कशी देता येईल, लसींचा मुबलक साठा कशाप्रकारे उपलब्ध करता येईल, याकडे सरकारने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. याच अनुषंगाने सरकारने कोविशिल्ड लसींच्या 50 लाख डोसची ब्रिटनला केली जाणारी निर्यात रद्द केली आहे.

भारतात हे वर्ष अधिक
जीवघेणं असेल

जगभरात कोरोना लसीच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग वेगाने पसरत आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे वर्ष अधिक जीवघेणं असेल, असा इशारा WHO ने दिला आहे.

सेट परीक्षेसाठी ऑनलाइन
अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा येत्या २६ सप्टेंबरला होणार आहे. या परीक्षेसाठी (SET Exam 2021) 17 मे ते 10 जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. यूजीसी महाराष्ट्र आणि गोवा (Goa) या राज्यांसाठीची सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येते. आतापर्यंत 36 वेळा सेट परीक्षा घेण्यात आली आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.