टाटा मोटर्सने 14 वर्षांपूर्वी म्हणजेच 2 जून 2008 रोजी फोर्डकडून जग्वार आणि लँड रोव्हर हे दोन लक्झरी कार ब्रँड खरेदी केले होते. हा करार भारतीय वाहन निर्मिती क्षेत्राला मिळालेलं मोठं यश होतं. मात्र, हा फक्त भारतीय वाहन निर्माती क्षेत्राचाच नाही तर रतन टाटा यांचा वैयक्तिक विजयदेखील होता. फोर्डच्या चेअरमनने रतन टाटा यांचा अपमान केला होता. रतन टाटा यांनी शांततेत आपल्या या अपमानाचा बदला घेतला. बिर्ला प्रीसिजन टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष वेदांत बिर्ला यांनी ही गोष्ट ट्विटरवर सांगितली आहे.
काय घडलं होतं?
1998 मध्ये टाटा मोटर्सने भारतातील पहिली स्वदेशी कार टाटा इंडिका लाँच केली होती, त्यावेळची ही गोष्ट आहे. टाटा इंडिका हा रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. मात्र, या गाडीला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. त्यामुळे कंपनीचं मोठं नुकसान झालं. कमी विक्रीमुळे टाटा मोटर्सला आपला कार व्यवसाय वर्षभरात विकायचा होता. यासाठी 1999 मध्ये टाटांनी अमेरिकेतील कार निर्माती कंपनी फोर्डशी बोलण्याचा निर्णय घेतला.
रतन टाटा त्यांच्या टीमसोबत बिल फोर्ड यांना भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते. बिल फोर्ड त्यावेळी फोर्डचे अध्यक्ष होते. दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांचा अपमान केला. कार व्यवसाय सुरू करून टाटांनी मोठी चूक केल्याचं बिल फोर्ड म्हणाले होते. बिल फोर्ड यांनी असंही म्हटलं होतं की, ‘प्रवासी कार विभागाबद्दल काहीच माहिती नसताना तुम्ही कार व्यवसाय का सुरू केला?’ या बैठकीनंतर दोन्ही कंपन्यांमध्ये कोणताही करार झाला नाही. आपले कार उत्पादन युनिट न विकण्याचा निर्धार करून रतन टाटा भारतात परत आले.
…आणि इतिहास घडला
या प्रकरणानंतर जे घडले ते व्यावसायिक जगतातील एक मोठी घटना आहे. 2008 च्या मंदीनंतर फोर्ड कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर होती. तर, नऊ वर्षांच्या काळानंतर टाटांसाठी परिस्थिती उत्तम होती. दिवाळखोरीत असलेल्या फोर्टाला रतन टाटा यांनी एक ऑफर दिली. या ऑफरनुसार फोर्ड पोर्टफोलिओचे दोन लोकप्रिय ब्रँड जग्वार आणि लँड रोव्हर टाटा मोटर्स खरेदी करणार होते. जून 2008 मध्ये, 2.3 बिलियन डॉलर्स किंमतीला टाटाने फोर्डकडून जग्वार आणि लँड रोव्हर विकत घेतले. हे दोन ब्रँड विकत घेऊन रतन टाटांनी आमच्यावर मोठे उपकार केल्याचं फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड म्हणाले होते. त्यांना अखेर रतन टाटांचे आभार मानावे लागले.