आज दि.२३ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

चीन नंतर अमेरिकेत
कोरोनाचा धोका वाढला

अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढताना दिसतोय. धक्कादायक बाब म्हणजे या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता आहे. अमेरिकेत लहान मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढताना दिसत आहे. गेल्या एका महिन्यात तब्बल 2 लाख 70 हजार मुलं कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत. गेल्या आठवड्यात 31 हजार 991 मुलं पॉझिटीव्ह झाली. सप्टेंबर 2021 च्या पहिल्या आठवड्यापासून आतापर्यंत 77 लाख मुलांना लागण झाली आहे. गेल्या दोन वर्षांत अमेरिकेतील 1 कोटी 28 लाख मुलं कोरोनाच्या विळख्यात अडकली आहेत. अमेरिकेतील तब्बल 19 टक्के मुलांना कोरोना होऊन गेला आहे.

उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर
उष्णतेची लाट संशोधकांचं टेन्शन वाढले

पृथ्वीचा अक्ष तिरका असल्यामुळे उत्तर ध्रुवावर थंडी असते, तेव्हा दक्षिण ध्रुवावर उन्हाळा असतो. मात्र एकाच वेळी दोन्ही ध्रुवांवर उष्णतेची लाट आढळून आल्याने संशोधकांचं टेन्शन वाढले आहे. वातावरण बदलामुळे आलेली ही स्थिती जगासाठी विनाशकारी ठरू शकते असे इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमॅट चेंज म्हणजे IPCCनं म्हटले आहे. परिस्थिती अशीच राहिली तर विनाश अटळ अशी भीती व्यक्त होत आहे.

‘काश्मीर फाईल्स’वरून जयंत पाटील
विरुद्ध फडणवीस यांच्यात खडाजंगी

‘काश्मीर फाईल्स’ वर जयंत पाटील बोलत असतानाच भाजपा आमदार योगेश सागर खाली बसून जोरजोरात बोलून व्यत्यय करत असल्याचं लक्षात येताच जयंत पाटील संतापले. “खाली बसून बोलण्याची पद्धत बंद करा. आम्हालाही खाली बसून बोलता येतं. त्यावेळी अडचण झाली तर बोलू नका,” असे खडे बोल जयंत पाटील यांनी सुनावले. यामुळे ‘काश्मीर फाईल्स’वरून जयंत पाटील विरुद्ध फडणवीस व भाजपा सदस्य अशी खडाजंगी सभागृहात पहायला मिळाली.

माणसाला भीती खात
असते : जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना हे विधान केलं आहे. “माणसाला भीती खात असते. रात्री ३ वाजता टकटक झालं, तर हार्ट अटॅक येण्याचीच शक्यता असते. ध्यानी-मनी-स्वप्नीच नसतं कुणाच्या घरात कोण घुसेल हे… यात सर्वात हाल होतात ते अशा माणसांचे ज्यांचा तुमच्या राजकारणाशी संबंध नसतो. माझ्या मुलीचा राजकारणाशी संबंध काय? पण तिला जर उद्या नुसतं बोलवलं, तरी ती आत्महत्या करेल. ते फ्री बर्ड्स आहेत. त्यांना या असल्या सवयी नाहीयेत”, असे आव्हाड म्हणाले आहेत. तसेच, “मला वाटतं की तिने या देशात राहू नये”, असं देखील आव्हाड म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या
पाठीत खंजीर खुपसला : सतेज पाटील

काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सतेज पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, “कोल्हापुरात २०१९ विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना-भाजप यांची युती होती. पण कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या विरोधात चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवार उभे करून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. पराभवाचे हे शल्य शिवसैनिक विसरणार नाहीत. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला माहित आहे”.

लालूप्रसाद यादव “फीट” आढळल्याने
दिला रुग्णालयातून डिस्चार्ज

सध्या तुरुंगवासात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक लालूप्रसाद यादव यांची तब्येत बिघडल्याने, त्यांना उपचारांसाठी नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) येथे आणले गेले होते. मात्र रुग्णालयात आरोग्य तपासणी दरम्यान ते दरम्यान “फीट” आढळल्याने त्यांना आज सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. अशी माहिती रुग्णालायतील सूत्रांकडून मिळाली आहे. तर, आरजेडीने मात्र या प्रकरणात राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला आहे.

तर आम आदमी पार्टी राजकारण
सोडेल : अरविंद केजरीवाल

पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने मोठा विजय मिळवत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता दिल्लीत महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या बद्दल भाजपावर हल्ला चढवला आणि खुलं आव्हान दिलंय. भाजपाने वेळेवर या निवडणुका घेतल्या आणि त्या जिंकल्या तर आम आदमी पार्टी राजकारण सोडेल, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.

युक्रेन सोडणाऱ्या महिलेच्या
बॅगेत आढळले 213 कोटी रुपये

रशियाकडून युक्रेनवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे लाखो लोकांना युक्रेन सोडलाय. यामध्ये यूक्रेनमधील एका माजी खासदाराच्या पत्नीचाही समावेश आहे. मात्र या महिलेने देश सोडताना स्वत:सोबत आणलेल्या बॅगांमधील सामान पाहून हंगेरी देशातील अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसलाय. हंगेरीमधील कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेच्या बॅगमध्ये अमेरिकी डॉलर्स आणि यूरो या चलनांमध्ये मोठी रक्कम सापडली आहे. सहा मोठ्या बॅगांमध्ये जवळजवळ २८ मिलियन डॉलर्स आणि १,३ मिलियन यूरो रोख रक्कम मिळाली आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम २१३ कोटी इतकी आहे.

हैदराबादमध्ये लागलेल्या भीषण
आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू

हैदराबादमध्ये भंगाराच्या गोडाऊनमध्ये लागलेल्या भीषण आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यावेळी एक कामगार स्वत:चा जीव वाचवण्यात यशस्वी ठरला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ कामगार पहिल्या माळ्यावर झोपले असतानाच तळमजल्यावर गोडाऊनला आग लागली.

शनिवारपासून मुंबईत यंदाच्या
आयपीएलची सुरूवात

शनिवारपासून मुंबईत सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगला फक्त २५ टक्केच प्रेक्षक मैदानात उपस्थित असतील, असं आयोजकांनी सांगितलं आहे. वानखेडे स्टेडियमवर शनिवारी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सामान्याने यंदाच्या आयपीएलची सुरूवात होत आहे. हा सामना अविस्मरणीय ठरणार आहे. कारण करोनाच्या जागतिक महामारीनंतर पहिल्यांदाच प्रेक्षक मैदानात येऊन सामना बघणार आहेत. हे सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातल्या मैदानांवर खेळले जातील. मात्र यावेळी करोना नियमांमुळे केवळ २५ टक्के प्रेक्षकांची उपस्थिती असेल. रिपब्लिक वर्ल्डने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे

जगातील अव्वल क्रमांकाची टेनिसपटू
अ‍ॅश्ले बार्टीने केली निवृत्तीची घोषणा

जगातील अव्वल क्रमांकाची महिला टेनिसपटू अ‍ॅश्ले बार्टी हिने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे. या बातमीमुळे क्रीडा जगतातसह तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूने बुधवारी तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि जड अंतःकरणाने टेनिसला अलविदा करत असल्याचं म्हटलंय.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.