मनसेकडून ३ मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या
मुहूर्तावर स्थानिक मंदिरांमध्ये ‘महाआरती’
मनसेकडून आणखी एक घोषणा करण्यात आली आहे.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरामध्ये मनसे कार्यकर्ते महाआरती करणार आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी ही माहिती दिली आहे. ”महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते ३ मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यभरात त्यांच्या स्थानिक मंदिरांमध्ये ‘महाआरती’ करतील. लाऊडस्पीकरवरून महाआरती केली जाईल.” असे सरदेसाई यांनी सांगितले आहे.
भोंग्यांबाबत मार्गदर्शक सूचना
केल्या जाणार : गृहमंत्री
मशिदींवरील भोंग्यांवरून भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर भोंग्यांबाबत कठोर धोरण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी भोंग्यांबाबत येत्या एक – दोन दिवसांत मार्गदर्शक सूचना प्रसृत करण्यात येणार असल्याचं सांगितलं. दरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण पूर्ण तयारीत असल्याचं स्पष्टच सांगितलं आहे.
राज ठाकरेंनी मंदिरावर भोंगे
लावावेत : रामदास आठवले
एका बाजूला भोंगे आहे तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहेत. भोंग्याच्या विषयावर वाद होता कामा नये. पिढ्यापिढ्यांपासून मशिदींवर भोंगे असतात. ते उतरण्याची मागणी करण्यापेक्षा राज ठाकरेंना मंदिरावर भोंगे लावयचे असतील तर त्यांनी लावावेत. पण धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये,” असे रामदास आठवले म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाची
समजूत काढावी : लक्ष्मण माने
साताऱ्यामध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये लक्ष्मण माने यांनी, “राज ठाकरेंचं वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणार असून त्यांच्याविरोधात पोलिसांनी तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी केलीय. इतकच नाही तर पुढे बोलताना माने यांनी, “मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी, नाहीतर घटनात्मक विधीमंडळ प्रमुख म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,” असं आवाहन केलं आहे. तसेच, “मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर (राज ठाकरेंवर) गुन्हा दाखल केला नाही तर प्रसंगी मी स्वत: त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहे,” असं इशाराही मानेंनी दिलाय.
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंच्या पत्नींना मोठा दिलासा, कोर्टाने निर्णय ठेवला कायम
भोसरी भूखंड कथित घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून या प्रकरणी अंतरिम दिलासा कायम ठेवण्यात आला आहे.पुणे भूखंड कथित घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. तसंच कोर्टात सुनावणी सुद्ध सुरू आहे. पुणे एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणात मंदाकिनी खडसे यांच्या अटक पूर्व जामिनावर आज सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली.
घरामध्ये पैसे मोजण्याचं मशीन, परळमध्ये जागा, नवी गाडी, सदावर्तेंची एसटी कर्मचाऱ्यांच्या पैशांमधून मालमत्ता खरेदी?
एसटी कामगारांची कोर्टात बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात आज धक्कादायक दावा केला आहे. सदावर्ते यांच्या घरी पैसे मोज्याचं मशीन सापडलं आहे. तसेच सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेल्या पैशांमधून मालमत्ता खरेदी केली. सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या पैशांतून मुंबईच्या परळमध्ये 60 लाखांची जागा घेतली, भायखळ्यातही मालमत्तेची खरेदी केली, तसेच नवी गाडी घेतली, अशी धक्कादायक माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आज गिरगाव कोर्टात युक्तीवाद करताना दिली.
बायडेन यांच्या युक्रेन दौऱ्याची
शक्यता व्हाइट हाऊसने फेटाळली
बायडेन यांच्या संभाव्य युक्रेन दौऱ्याची शक्यता व्हाइट हाऊसने फेटाळून लावलीय. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची किव्हमध्ये भेट घेण्यासंदर्भात बायडेन यांचा कोणताही विचार नसल्याचं व्हाइट हाऊसने स्पष्ट केलं आहे. व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या जेन पास्की यांनी सोमवारी (स्थानिक वेळेनुसार) यासंदर्भातील खुलासा केल्याचं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलंय.
श्रीलंकेत १७ सदस्यांच्या
नव्या मंत्रिमंडळाची नियुक्ती
श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी १७ सदस्यांच्या नव्या मंत्रिमंडळाची नियुक्ती केली. पंतप्रधान महिंदराजपक्षे वगळता अध्यक्षांच्या इतर जवळच्या नातेवाईकांना या मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. देशाला भेडसावणाऱ्या आजवरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटामुळे अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांनी ‘व्यवस्था परिवर्तनाचे’ (सिस्टीम चेंज) आवाहन केले.
७१ हजारांच्या स्कूटीसाठी घेतला
पंधरा लाख खर्चून नंबर
केवळ ७१ हजारांच्या स्कूटीसाठी एका व्यक्तीने नंबर प्लेटवर १५ लाख रुपये खर्च केले. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. हे विचित्र प्रकरण चंदीगड सेक्टर २३ चे असल्याचे सांगितले जात आहे. ब्रिजमोहन नावाचा ४२ वर्षीय व्यक्ती सध्या चर्चेत आहे. बृजमोहन यांनी सांगितले की, मुलाच्या सांगण्यावरून त्यांनी १५.४ लाख रुपये देऊन हा नंबर खरेदी केला आहे. हा VIP क्रमांक CH01-CJ-0001 असा आहे.
करोना संसर्ग होण्याची भीती असल्याने
आयपीएल सामन्याची जागा बदलली
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होऊन तीन आठवडे झालेले आहेत. सर्व सामने सुरळीत सुरु असताना आता दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील पाच जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे खबरदारी म्हणून बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या २० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणारा सामना हा पुणेऐवजी मुंबईत खेळवला जाणार आहे. प्रवासादरम्यान करोना संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे
SD social media
9850 60 35 90