जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून स्थलांतरित नागरिकांना लक्ष्य केलं जात असून शोपियाँ जिल्ह्यात ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उत्तर प्रदेशातील दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी हरमन परिसरात स्थलांतरित नागरिकांच्या दिशेने ग्रेनेड फेकत हा हल्ला केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मनिष कुमार आणि राम सागर अशी या कामगारांची नावं आहेत. दोन्ही पीडित उत्तर प्रदेशातील कनूज जिल्ह्यातील आहेत. टीआरफने (The resistance front) या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून, दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
मनिष कुमार आणि राम सागर एका शेडमध्ये झोपलेले असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. शेडमध्ये एकूण पाच कामगार झोपले होते. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार “दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात उत्तर प्रदेशातील दोन कामगार जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. आम्ही परिसर सील केला आहे”.
दहशतवाद्यांनी अल्पसंख्यांकावर केलेला हा एका आठवड्यातील दुसरा हल्ला आहे. १५ ऑक्टोबरला एका काश्मिरी पंडितची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पूरन कृष्ण भट असं या पीडित व्यक्तीचं नाव होतं.