मान्सून लवकर येण्याची
शक्यता वाढली
राज्यात मान्सून लवकर येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मोसमी पाऊस अंदमानात दाखल होण्याचा अंदाज आहे. पाच दिवस आधीच मान्सून अंदमानात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळ शमताच कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. त्यामुळे मान्सूनची वाट सुकर झाली आहे. दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात 15 मे रोजीच मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मोदी सरकार अल्पसंख्यांकासाठी
वेदनादायी : सोनिया गांधी
राजस्थानमधील उदयपूरमध्ये तीन दिवस हे चिंतन सुरु असणार आहेत. यावेळी सोनिया गांधी यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशात ध्रुवीकरणाचं वातावरण आणि भीती निर्माण केली जात असल्याचा आरोप सोनिया गांधींनी केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या ‘कमाल प्रशासन, किमान सरकार’ या घोषणेचा अर्थ वेदनादयीपणे स्पष्ट झालं आहे. याचा अर्थ देशाला सतत ध्रुवीकरणाच्या स्थितीत ठेवणं तसंच लोकांना नेहमी भीती आणि असुऱक्षित स्थितीत राहण्यात भाग पाडणं आहे. याशिवाय समाजाचा अविभाज्य भाग असलेल्या आणि समान नागरिक असलेल्या अल्पसंख्याकांना अत्याचारित आणि अनेकदा क्रूरपणे लक्ष्य करणे”. असेही सोनिया गांधी या वेळी म्हणाल्या आहेत.
नीट परीक्षा पुढे ढकलण्याची
याचिका न्यायालयाने फेटाळली
नीट परीक्षा २०२२ (NEET-PG 2022) पुढे ढकलण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. “परीक्षा आयोजित करण्यात येणाऱ्या विलंबामुळे निवासी डॉक्टरांची संख्या कमी होईल.” असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी काही वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या गटाने केली होती. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहले होते. तसेच परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलनही करण्यात येत आहे.
ट्विटर विकत घेण्याची
डील तात्पुरती स्थगित
प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर विकत घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण ट्विटर विकत घेण्याची डील तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मस्क यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. याचे परिणाम शेअर मार्केटमध्येही दिसून आले आहेत. यामुळे शेअर्स प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये २० टक्क्यांनी घसरले आहेत. ट्विटरवर सध्या ५ टक्क्यांहून कमी स्पॅम आणि बनावट अकाऊंट्स आहेत, या अकाऊंट्सची माहिती अद्याप ट्विटरकडून आपल्या टीमला मिळाली नसल्याने ट्विटर खरेदीची डील तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याचे मस्क यांनी ट्विटमध्ये म्हणाले आहे.
राज ठाकरे यांच्या
सुरक्षेत वाढ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्य सरकारने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत धमकीचं पत्र मिळाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
कुठल्याही परिस्थितीत घाबरून
जायचे नाही : राजेश टोपे
राज्यामध्ये करोनाचे रुग्ण वाढत असल्याने सर्वत्र काही प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र यासंदर्भात आज टोपेंनी दिलासादायक स्पष्टीकरण दिलं आहे. “मास्कबाबतचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. एक नक्की आहे की १००-१२५ संख्येनं आज रुग्णसंख्या वाढतेय. पण ते फारसं भीतीदायक किंवा गंभीर नाहीये. कुठल्याही परिस्थितीत हा घाबरून जाण्याचा विषय नाही”, असं राजेश टोपे म्हणाले.
सौरभ गांगुलीच्या सर्वोत्तम
अकरामध्ये विराट कोहली नाही
जगातील सर्वोत्तम क्रिकेटर्समध्ये विराट कोहलीचं नाव घेतलं जातं. अनेक दिग्गज खेळाडूंनी त्यांच्या ऑल टाईम प्लेईंग 11 मध्ये विराट कोहलीचा समावेश केला आहे. मात्र बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली हे यासाठी अपवाद ठरले आहेत. नुकतंच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी त्यांचं सर्वोत्तम प्लेईंग 11 निवडलं आहे. मुख्य म्हणजे यामध्ये, सौरव गांगुली यांनी विराट कोहलीचा समावेश केला नाहीये. दरम्यान यामागे विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यात झालेल्या वादाचे परिणाम असल्याचा अर्थ काढण्यात आला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी
संजीवनी करंदीकर यांचं निधन
प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं निधन झालं आहे. त्या ८४ वर्षांच्या होत्या.
संजीवनी करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. ३८ वर्षे त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये मशीन सेक्शन अधिकारी म्हणून काम केलं होतं.शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या त्या ‘आत्या’ आहेत. तर, चित्रपट सेनेच्या पदाधिकारी कीर्ती फाटक यांच्या त्या मातोश्री होत.
जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त शेतकऱ्यांचा होणार गौरव!
आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन व कृषी पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे सोमवार, 16 मे रोजी कृषी पर्यटन विकासाशी संबंधित विविध कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. कार्यक्रमात एका विशेष पुरस्कार सोहळ्याचे देखील आयोजन केलेले आहे. राज्यातील नाविन्यपूर्ण पद्धती वापरून यशस्वीरित्या कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या प्रयत्नांना व कल्पनांना या कार्यक्रमात पुरस्कृत केले जाणार असल्याचे राज्यसरकारकडून सांगण्यात आले.
कृषी पर्यटन विकास हे करिअरचे अनोखे क्षेत्र ठरू शकते, म्हणूनच या क्षेत्रातील विविध पैलूंची माहिती इच्छुकांपर्यंत पोहचवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
अनिल देशमुख यांना मोठा झटका, खासगी रुग्णालयात उपचाराला कोर्टाचा नकार
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. अनिल देशमुख यांच्या खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी देण्यात यावी असा अर्ज कोर्टात सादर करण्यात आला होता. अनिल देशमुखांच्या या अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने त्यांना परवानगी नाकारली आहे.
खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी नाकारल्यामुळे आता जे. जे. रुग्णालयातच अनिल देशमुख यांच्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया होईल. उपचार सुरू असताना देशमुख परीवारातील कोणता सदस्य देशमुखांजवळ थांबेल याचे नाव कोर्टाने द्यायला
सांगितले आहे.
“आम्ही चॅलेंज स्वीकारलं; …तुम्हालाही त्याच मातीत गाडणार” औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकणाऱ्या ओवैसींना संजय राऊतांचा इशारा
मशिदींवरील भोंग्यांवरुन वातावरण तापलेलं असतानाच एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी हे गुरुवारी औरंगाबादेत आले आणि त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावरुन शिवसेनेसोबतच इतर राजकीय पक्षांनी ओवैसींवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तर थेट ओवैसींना इशाराच दिला आहे. तुम्हालाही त्याच कबरीत गाडणार असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन हा रितीरिवाज असू शकत नाही. संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकायचे. यातून जर महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची असं काही तरी राजकारण ओवैसींचं दिसत आहे. मी इतकंच सांगेन की, त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली. त्याला कबरीत आम्ही टाकलं. महाराष्ट्रावर चाल करणारा हा मुघल राजा. तुम्ही आज कबरीवर येऊन नमाज पडत आहात… कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल.
SD social media
9850 60 3590