आयसीयूत बांधली लग्नगाठ, आईच्या इच्छेखातर मुलीने रुग्णालयात घेतली सप्तपदी
आई आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असल्याने मुलीने रडत रडतच आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी रुग्णालयातच लग्नाची सप्तपदी घेतली. साखरपुड्याची तारीख २६ डिसेंबर ठरली होती. पण आईची प्रकृती गंभीर असल्यानं अखेर २५ डिसेंबरला रुग्णालयातच लग्न करण्याचा निर्णय तरुणीने घेतला. लग्नानंतर नवदाम्पत्याने आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर अवघ्या दोन तासातच आईने अखेरचा श्वास घेतला. बिहारच्या गया इथं ही घटना घडली.
गया इथं एका खासगी रुग्णालयात एका महिलेला हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने दाखल करण्यात आले होते. महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कुटुंबियांना दिली. तसंच आईने मुलीचं लग्न डोळ्यांनी बघायचंय अशी इच्छा व्यक्त केली.
संजय राऊतांचा बॉम्ब फुसका ठरला; उद्धव ठाकरेंनीही वेळ मारून नेली!
उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राणाभीमदेवी थाटात नागपुरात आरोपांचे बॉम्ब फोडू असा इशारा दिला होता, त्यामुळे सकाळपासूनच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कोणता बॉम्ब फोडणार? याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु होती. दुपारी बाराच्या सुमारास राऊतांनी अगरबत्ती जोडलेला सुतळी बॉम्बचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला. त्यामुळे ठाकरे-राऊत सत्ताधाऱ्यांविरोधात कोणता बॉम्ब फोडणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली.
उद्धव ठाकरे, संजय राऊत विधिमंडळ परिसरात आले. ठाकरेंनी अधिवेशनाच्या कामकाजात सहभाग घेतला. विधानपरिषदेत सीमावादावरुन सरकारवर निशाणाही साधला. त्यानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील विरोधकांच्या आंदोलनातही ठाकरे-राऊत सहभागी झाले. मात्र तिथेही ठाकरे-राऊतांनी कुठलाच आरोपांचा बॉम्ब फोडला नाही. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी बॉम्ब तयार, वातीही काढल्यात. पेटवण्याचा अवकाश आहे, असं म्हणत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संजय राऊतांचा बॉम्ब फुसका ठरल्याची चर्चा सुरु झालीय.
IPL 2023च्या आयोजनात ICCच्या नियमाचा अडथळा, BCCIसमोर तयारीचा पेच
आयपीएल लिलावानंतर आता बीसीसीआयकडून 16 व्या हंगामाच्या आयोजनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. आयपीएल 2023 कधीपासून सुरू होणार यासाठी अद्याप तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. पण यावेळी आयपीएल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊन 31 मे रोजी फायनल सामना खेळला जाईल असं म्हटलं जात आहे. बीसीसीआयने आयपीएल 2023 चे नियोजन करताना 74 दिवस खेळवण्याची योजना होती. पण त्यात आयसीसीच्या नियमाचा अडथळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएलचा 16 वा हंगाम हा 74 दिवसांऐवजी 60 दिवसांचा होऊ शकतो.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामुळे बीसीसीआयला आयपीएलची स्पर्धा 74 दिवस खेळवता येणार नसल्याची चिन्हे आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून रोजी इंग्लंडमध्ये ओव्हलवर होणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलच्या इव्हेंटआधी 7 दिवस आणि त्यानंतरचे 7 दिवस कोणत्याही स्पर्धेचे आयोजन केले जाऊ शकत नाही. महिला आयपीएलसुद्धा मार्च महिन्यात होणार आहे. याचे शेड्युल अद्याप आलेलं नाही. त्यामुळे बीसीसीआयकडे आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी 60 दिवसांचीच विंडो असेल.
मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट; अभिनेत्याची आत्महत्या नाही तर हत्याच?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020रोजी त्याच्या वांद्राच्या राहत्या घरी मृत्यू झाला. त्यानं गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं असं तपासांती पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र आता दोन वर्षांनी या प्रकरणात नवा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सुशांतचा मृत्यू हा सर्वांसाठी धक्कादायक होता. त्यानं आत्महत्या केली हे कोणालाच मान्य नव्हतं. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह अंधेरीच्या कूपर रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी नेण्यात आला होता. पोस्टमार्टमच्या वेळी उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्यानं सुशांतच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा केला आहे.
एशियानेट न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, ‘सुशांतच्या पोस्टमार्टमवेळी रुपकुमार शाह हा कर्मचारी तिथे होता. त्यानं दावा केलाय की, जेव्हा सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला तेव्हा त्याचं पोस्टमार्टम करण्यासाठी त्याला कूपर रुग्णालयात आणण्यात आलं. त्या वेळेस कूपरमध्ये 5 बॉडी पोस्टमार्टमसाठी आणण्यात आल्या होत्या. त्यातील एक VIP डेड बॉडी होती. आम्ही पोस्टमार्टमसाठी गेलो तेव्हा आम्हाला कळलं की बॉडी सुशांत सिंह राजपूतची होती. त्यांच्या शरिरावर अनेक खुणा होत्या. मानेवरही 2-3 ठिकाणी जखमांच्या खुणा होत्या. पोस्टमार्टमचं रेकॉर्डिंग करायला हवी होती. पण उच्च अधिकाऱ्यांकडून आम्हाला केवळ बॉडीचे फोटो काढायला सांगितले. आम्ही तेव्हा ते काही केलं ते त्यांच्या आदेशानुसार केलं’.
चार तास स्वत:ला कोंडून घेतलेले अब्दुल सत्तार अवतरले
नेहमी कोणत्या-कोणत्या कारणांनी चर्चेत राहणारे अब्दुल सत्तार पुन्हा एकदा विरोधकांच्या आरोपावरून चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या सत्तार यांच्यावर आता जमीन घोटाळ्याचा आरोप होतोय. सोबतच त्यांच्या सिल्लोड मतदारसंघात होणाऱ्या कृषी प्रदर्शनासाठी कृषी विभागात पैसे वसूल करण्यात येत असल्याचा आरोपही सत्तार यांच्यावर करण्यात आला आहे. तर या सर्व प्रकरणावरून विरोधक आक्रमक होतांना दिसत आहे. तर सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील यावेळी करण्यात येत आहे.त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांच्यावर आरोप झाल्यावर सत्तारांनी स्वत:ला तब्बल 4 तास कोंडून घेतलं होतं.
बाहेर आल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी माझ्यावर लागलेल्या सर्व आरोपांना विधानसभेत उत्तर देऊ, असं स्पष्टीकरण दिलं. यानंतर अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रामगिरी निवासस्थानाकडे निघाले. मुख्यमंत्र्यांना भेटून आपली बाजू मांडणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलं.
साईंच्या झोळीत थेट युरोपच्या भक्ताकडून हिरेजडित मुकुट अर्पण
शिर्डी येथील साईबाबांच्या दानपेटीत कोव्हिड कालावधीनंतर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असून या काळात भाविकांच्या संख्येतही वाढ झाली आहे.साईबाबांच्या दानपेटीत मागील ऑक्टोबर 2021 पासून ते नोव्हेंबर 2022 या वर्षभरात 398 कोटी रुपयांपेक्षा जास्त भरभरून दान जमा झाले आहे. सुमारे अडीच ते तीन कोटी भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली आहे.आज थेट युरोपमधील एका साईभक्ताने बाबांना हिरेजडीत मुकुट अर्पण केला आहे. 368 ग्रॅम वजन असलेल्या हिरेजडीत सुवर्ण मुकुटाची किंमत जवळपास 28 लाख रुपये इतकी आहे. देशातील नंबर एकचे तिर्थक्षेत्र तिरुपती बालाजी देवस्थानच्या तुलनेत साईबाबांच्या चरणी चाळीस टक्के दान जमा झाले आहे. तिरुपती बालाजी देवस्थानचे वार्षिक दान जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या घरात असते. त्या तुलनेत देशात तिरुपतीनंतर शिर्डीच्या साईबाबांचा नंबर लागतो. हळूहळू या दानाचा आकडा वाढतच चालला आहे. यंदाच्या वर्षातील एवढे मोठे दान हा साईबाबा संस्थानच्या इतिहासात विक्रमच आहे.
जेली चॉकलेटने घेतला एक वर्षांच्या चिमुकलीचा जीव, आईचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा
साताऱ्यात एक वर्षाच्या चिमुकलीचा चॉकलेट घशात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. चॉकलेट घशात अडकल्याचं लक्षात आल्यानंतर आईने मुलीला रुग्णालयात नेलं पण त्याआधीच मुलीचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या मुलीचं नाव शर्वरी सुधीर जाधव असं आहे. साताऱ्यात कर्मवीरनगरमध्ये रविवारी रात्री ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शर्वरीला शेजारी राहणाऱ्या लहान मुलीनं जेली चॉकलेट खायला दिलं होतं. शर्वरीने चॉकलेट गिळल्यानंतर ते घशात अडकलं. तेव्हा तिला खोकल्याचा त्रास सुरू झाला. यानंतर काही वेळातच शर्वरी बेशुद्ध झाली. जेव्हा आईच्या लक्षात ही बाब आली तेव्हा घराच्या शेजारी राहणाऱ्या देवबा जाधव यांच्या मदतीने शर्वरीला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
BF.7 व्हेरियंटचा भारताला जास्त धोका नाही!
कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. यादरम्यान तज्ज्ञांकडून एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचा BF.7 व्हेरियंट भारतीयांसाठी चीन इतका गंभीर ठरणार नाही. सेल्युलर आणि मॉलिक्युलर बायोलॉजीचे संचालक विनय के. नंदीकुरी म्हणाले की, भारतीय नागरिकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार झाली आहे. त्यामुळे ओमिक्रॉन आणि त्याचे व्हेरियंट भारतासाठी जास्त धोकादायक ठरणार नाहीत.
तरीही नागरिकांनी कोविडबाबत खबरदारी घेऊन वागलं पाहिजे, असा सल्ला नंदीकुरी यांनी दिला आहे. याशिवाय ते असंही म्हणाले की, हा विषाणू रोगप्रतिकारक शक्तीचं कवच कधीही तोडू शकतो. त्यामुळे लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही संसर्ग क्षमता जास्त असलेल्या या व्हेरियंटची लागण होऊ शकते. ओमिक्रॉनच्या आधी आलेल्या व्हेरियंटचाही पुन्हा संसर्ग होऊ शकतो.
बजेटआधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण रुग्णालयात
बजेट अवघ्या एका महिन्यावर आलं असतानाच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. संपूर्ण देशाला अर्थमंत्री निर्मला सितारमण बजेटमध्ये कोणत्या गोष्टी मांडणार याची प्रतिक्षा असताना ही बातमी समोर आली आहे.
CNN-न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, 63 वर्षीय सीतारमण यांना दुपारी 12 च्या सुमारास रुग्णालयातील खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ तोंडावर असताना केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी आली आहे. 1 फेब्रुवारी रोजी 2023 चा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
हिंदूंनी घरात शस्त्र ठेवावीत नाहीतर.. प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे पुन्हा वादग्रस्त विधान
देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही, असे कालीचरण महाराज नुकतेच म्हणाले होते. यावरुन वाद सुरू असतानाच आता भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. “हिंदूंना त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणाऱ्यांना उत्तर देण्याचा अधिकार आहे.” असं वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी कर्नाटकात रविवारी केलं. शिवमोग्गा, कर्नाटक येथे आयोजित हिंदू जागरण वैदिकच्या दक्षिण विभागीय वार्षिक परिषदेला खासदार उपस्थित होत्या. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
SD Social Media
9850 60 3590