पाच सुवर्णपदकांसह ९ पदकांची कमाई
कनिष्ठ गटाच्या तिसऱ्या स्तरावरील आशिया चषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्णपदकांसह तीन रौप्य, एक कांस्य अशी एकूण नऊ पदकांची कमाई केली.
ऑलिम्पिक प्रकार नसलेल्या कम्पाउंड प्रकारात भारतीयांनी एका स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केली. मुलींच्या विभागात भारतीय खेळाडूंनी वैयक्तिक प्रकारात निर्विवाद वर्चस्व राखताना तीनही क्रमांक पटकावले. यामध्ये प्रगतीने सुवर्ण, आदिती स्वामीने रौप्य, तर परमीत कौरने कांस्यपदक मिळवले. मुलांच्या गटात प्रियांश आणि ओजस देवतळे यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्यपदक जिंकले.
भारताच्या मुले आणि मुलींनी सांघिक सुवर्णपदक पटकावताना तुल्यबळ कोरिया संघावर मात केली. केवळ मिश्र प्रकारात भारतीय खेळाडूंना पदक मिळवता आले नाही. भारताच्या ओजस आणि प्रगती जोडीला व्हिएतनामच्या जोडीकडून उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. रिकव्र्ह प्रकारात भारताने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावले. आकाश मृणावल आणि पार्थ साळुंखे यांनी कोरियन जोडीला नमवत सोनेरी यश मिळवले. तिशा पुनिया आणि पार्थला मिश्र प्रकारात तैवानच्या जोडीविरुद्ध सुवर्णपदकाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला.