अमेरिका पुन्हा एक गोळीबाराच्या घटनेलं हादरलं आहे. कॅलिफोर्नियाच्या नॅशविले भागातील एका प्राथमिक शाळेत २८ वर्षीय महिलेकडून गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून यात तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. २७ मार्च रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी १० वाजताच्या सुमारास नॅशविले भागातील एका प्राथमिक शाळेत महिलेकडून गोळीबार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने पोलिसांच्या दिशेने बंदूक रोखल्याने अखेर पोलिसांकडूनही गोळीबार करण्यात आला. या घटनेत आरोपी महिलेचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, गोळीबार करण्यामागे महिलेचा नेमका उद्देश काय होता, याबाबत अद्याप अस्पष्टता असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रविवारीही कॅलिफोर्नियातील एक गुरुद्वारामध्ये दोन तरुणांकडून एकमेकांवर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत दोन जण जखमी झाले होते.