पुण्यात गरीबांच्या घरांवर बुलडोझर चालवला

पुण्यात आंबील ओढ्यावरुन (Pune Ambil Odha) मोठा वाद पाहायला मिळाला. ओढ्यालगत असणाऱ्या घरांवर बुलडोझर चालवला गेला. प्रशासनाने कोणताही मागचापुढचा विचार न करता गरीबांच्या घरांवर बुलडोझर चालवला. गरीब रस्त्यावर आले. या सगळ्या प्रकरणावर आजच्या सामना अग्रलेखातून पुणे महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करण्यात आली आहे. पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात आहे. गरीबांच्या घरांवर बुलडोझर चालवणं हा संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

पुण्याची सूत्रे सध्या बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात
अनधिकृत, बेकायदेशीर घरांचा आणि झोपड्यांचा प्रश्न मुंबईतच नाही तर पुणे, पिंपरी, चिंचवडसारख्या शहरातही वाढला आहे. पुण्यामध्ये आंबिल ओढ्यालगत असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका कर्मचारी, पोलीस पोहोचले तेव्हा स्थानिक जनता आक्रमक झाली. हे सर्व बिल्डरांच्या आदेशाने सुरू आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पुण्याची सूत्रे सध्या बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात गेली आहेत. मुंबईच्याच जमिनी सोन्याच्या भावाने जात नाहीत. उलट पुणे याबाबतीत मुंबईच्या पुढे पाच पावले गेले आहे. आंबिल ओढ्यातील कारवाईने ते पुन्हा सिद्ध झाले.

उद्धव ठाकरे यांचे सरकार अत्यंत संवेदनशील पद्धतीने काम करीत असतानाच पुण्यात गरीबांच्या घरांवर बुलडोझर फिरवून त्यांना निराधार, बेघर करण्यात आले. हा प्रकार धक्कादायक, संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा आहे. पुण्याच्या आंबिल ओढा परिसरातील नागरिकांचा आक्रोश एव्हाना सरकारच्या कानापर्यंत गेलाच असेल. या परिसरातील घरांवर पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली व घरे पाडण्यास सुरुवात केली तेव्हा लोक रस्त्यावर उतरून ओक्साबोक्सी रडत असल्याचे चित्रण वृत्तवाहिन्यांनी दाखवले.

महिला, लहान मुले, वृद्ध सगळ्यांच्या अश्रूचा बांध फुटला. ही घरे बेकायदेशीर असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. ती कायदेशीर की बेकायदेशीर ते नंतर पाहू, पण भरपावसाळ्यात घरांवर बुलडोझर फिरवून लोकांना रस्त्यावर आणणे हे अमानुष तसेच निर्घृण आहे. अनधिकृत, बेकायदेशीर घरांचा आणि झोपडय़ांचा प्रश्न मुंबईतच नाही तर पुणे, पिंपरी, चिंचवडसारख्या शहरातही वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.