शेवटच्या बॉलपर्यंत गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गुजरात टायटन्सवर 5 धावांनी थरारक विजय मिळवला आहे. मुंबईने गुजरातला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले होते. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी शानदार कमबॅक केलं. डॅनियल सॅम्स मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला.
गुजरातला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी अवघ्या 9 धावांची गरज होती. मात्र डॅनियल सॅम्सने चिवटपणे गोलंदाजी करत फक्त 3 धावाच दिल्या.
यासह मुंबईला गुजरातला 20 ओव्हरमध्ये 172 धावांवर रोखण्यात यश आलं. मुंबईचा या मोसमातील हा दुसरा विजय ठरला. तसेच गुजरातला प्लेऑफसाठी क्वालिफाय होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
गुजरातला शेवटच्या बॉलवर विजयासाठी 6 धावांची गरज होती. मात्र डॅनियल सॅम्सने चलाखीने सेट असलेल्या डेव्हिड मिलरला फुलटॉस बॉल टाकला. यावर मिलर मोठा फटका मारण्यात अपयशी ठरला. यासह मुंबईने थरारक विजय मिळवला.
गुजरातकडून विकेटकीपर ऋद्धीमान साहाने सर्वाधिक 55 धावा केल्या. शुबमन गिलने 52 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन हार्दिक पंड्याने 24 रन्स केल्या. साई सुदर्शन 14 धावा करुन माघारी परतला. तर डेव्हिड मिलरने नाबाद 19 धावा केल्या. मुंबईकडून मुर्गन अश्विनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर कायरन पोलार्डने एका फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
दरम्यान त्याआधी गुजरातने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 177 धावा केल्या. मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. कॅप्टन रोहित शर्माने 43 धावा जोडल्या. तर टीम डेव्हिडने महत्तवपूर्ण 44 धावा कुटल्या.
तिलक वर्माने 21 रन्स केल्या. सूर्यकुमार यादव 13 धावा करुन माघारी परतला. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर प्रदीप सांगवन, अल्झारी जोसेफ आणि लॉकी फर्ग्यूसन या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेविड, कायरन पोलार्ड, डेनियल सैम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह आणि रिले मेरेडिथ.
गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, प्रदीप सांगवन, लॉकी फर्ग्यूसन, अल्जारी जोसेफ आणि मोहम्मद शमी.