ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन
ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचं वयाच्या ८० व्या वर्षी निधन झालं. मुंबईत हिंदुजा रुग्णालयात त्यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. विनोदी लेखन आणि क्रीडा पत्रकारीतेसाठी ते प्रसिद्ध होते. प्रकृती बिघडल्याने शिरीष कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारावेळी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.शिरीष कणेकर यांची ओळख शैलीदार लेखक, फिल्मी गप्पांची मैफल रंगवणारे वक्ते अशी होती. वृत्तपत्रांमध्ये सिनेमा, क्रिकेट, राजकारण यावर त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध आहे. तसंच कणेकरी, फिल्लमबाजी, शिरीषासन यातून त्यांनी विनोदी लेखनही केलं.
आता पुन्हा एका नवीन चक्रीवादळाचे संकट; नाव अजून ठरलेले नाही
‘मोचा’ हे चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये नवीन चक्रीवादळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. देशातील सुमारे १२ राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषकरुन आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि ओडिशातील काही भागात अति मूसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. पुढील काही दिवसांमध्ये यात वाढ होण्याची शक्यता आहे. तेलंगणा राज्यात पुढील तीन दिवस लोकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर भारतामधील डोंगराळ भागांमध्येही पुढील आठवड्याभरात जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक भागांना येत्या काही दिवसात पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या खाडीमध्ये पश्चिम, मध्य आणि नैऋत्येला ही स्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ समुद्राच्या पाणी पातळीपासून ५.८ ते ७.६ किलोमीटरवर आहे.
जळगावात मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा, सुषमा अंधारेंचा ‘या’ दोन नेत्यांवर आरोप
महाराष्ट्रातील बांधकाम कामगार आणि वेठबिगारांसाठी राज्य सरकारची मध्यान्ह भोजन योजना सुरू आहे. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचं वृत्त एका मराठी वर्तमान पत्राने प्रसिद्ध केलं होतं. या वृत्ताचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडून या योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली होती. एकनाथ खडसे यांनी यावेळी जळगाव जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजनेवर खर्च कलेल्या मार्च आणि एप्रिल २०२३ मधील खर्चाची आकडेवारी मांडली होती.दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन मध्यान्ह भोजन योजनेवर खर्च केलेल्या गेल्या सात ते आठ महिन्यांच्या खर्चाची आकडेवारी मांडली. ही आकडेवारी सादर करत अंधारे यांनी तब्बल १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत अंधारे यांनी या घोटाळ्याप्रकरणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बोट दाखवलं. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्रीसुद्धा आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी काल बंगळुरू येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत विद्युत दाहीनीमध्ये ११.५० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक नेते मंडळी यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.
‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला शरद पोंक्षेंचा रामराम
स्टार प्रवाह वाहिनीवर ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सुप्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. या मालिकेच्या निमित्ताने एकत्र कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. यात कानिटकर कुटुंब दाखवण्यात आले आहे. या मालिकेत दादा काका या पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केले होते. अभिनेते शरद पोंक्षे यांनी ही भूमिका साकारली होती. मात्र आता त्यांनी या भूमिकेला रामराम केला आहे.“गेली दोन वर्ष स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी ही माझी मालिका चालू होती. त्यात मी विनायक कानिटकर हे पात्र साकारत होतो. पण काही कारणांमुळे आणि पुढे घेतलेल्या काही प्रोजेक्टमुळे मी ठिपक्यांची रांगोळी या मालिकेसाठी फारसा वेळ देऊ शकणार नाही.माझ्यामुळे त्या मालिकेचे नुकसान होऊ नये म्हणून ५०० भाग पूर्ण झाल्यावर मी ती मालिका सोडलेली आहे. माझ्या जागी माझा अत्यंत जवळचा मित्र आणि उत्तम अभिनेता उदय टिकेकर हे तुम्हाला विनायक कानिटकर ही भूमिका साकारताना दिसतील. तुम्ही मला जसं प्रेम दिलंत तसंच प्रेम उदय आणि त्याच्या व्यक्तीरेखेलाही द्याल अशी मला खात्री आहे. पुन्हा नवीन एखाद्या मालिकेतून किंवा नाटकातून भेटू”, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे.
प्रदर्शनापूर्वीच कमल हसन यांच्या ‘इंडियन २’ चित्रपटाचा जलवा
अभिनेते कमल हसन यांचा १९९६ साली ब्लॉकबस्टर ठरलेला ‘इंडियन’ या चित्रपटाचा सीक्वल ‘इंडियन २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तब्बल २७ वर्षांनंतर या चित्रपटानिमित्ताने दिग्दर्शक शंकर व कमल हसन पुन्हा एकत्र काम करत आहेत. दरम्यान, या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच मोठा धमाका केला आहे. ‘इंडियन २’ या चित्रपटाचे ओटीटी अधिकार मोठ्या किमतीला विकल्याचं समोर आलं आहे.‘ट्रॅक टॉलीवूड’ नावाच्या वेब साईटनुसार, कमल हसन यांच्या ‘इंडियन २’या चित्रपटाचे ओटीटी अधिकार नेटफ्लिक्सला तब्बल २०० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. यामागचे कारण दिग्दर्शक शंकर असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या ‘२.०’ या चित्रपटाला देशासह जगभरातील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. ‘२.०’ या चित्रपटाने जगभरातून जवळपास ७०० कोटींची कमाई केली होती. त्यामुळे शंकर यांच्या आगामी ‘इंडियन २’ या चित्रपटाचा बोलबोला सुरू आहे.
रशियात लिंगबदल शस्त्रक्रिया, ट्रान्सजेंडर विवाहांवर बंदी, संसदेच्या दोन्ही सभागृहांकडून कायदा संमत
रशियामध्ये लिंगबदल शस्त्रक्रियांवर बंदी घालणाऱ्या कायद्यावर अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वाक्षरी केली आहे. या कायद्यामुळे आता रशियात कोणतीही व्यक्ती लिंग बदलण्याच्या उद्देशाने कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया करू शकणार नाही. अध्यक्ष पुतिन यांचा हा निर्णय रशियातील एलजीबीटीक्यू+ समुदायासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. दी गार्डियनच्या रिपोर्टनुसार रशियातील संसदेच्या दोन्ही सभागृहांनी सर्वानुमते हा अधिनियम पारित केला आहे.या नव्या कायद्यामुळे आता रशियात कुठलीही व्यक्ती लिंगबदलाची शस्त्रक्रिया करू शकणार नाही. तसेच ज्या जोडप्यांनी लिंग बदलून लग्नं केली आहेत, ती लग्नंदेखील आता रद्द होतील. यासह ट्रान्सजेंडर पालक मुलं दत्तक घेऊ शकणार नाहीत.
बँकांकडून वर्षभरात २.०९ लाख कोटींच्या बुडीत कर्जांचे निर्लेखन
मार्च २०२३ अखेर संपलेल्या २०२२-२३ या सरलेल्या आर्थिक वर्षात बँकांनी एकंदर २ लाख ९ हजार कोटी रुपयांच्या थकीत कर्ज रकमेवर जवळपास पाणी सोडल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी मागील पाच वर्षात बँकांकडून एकूण कर्ज निर्लेखित (राइट-ऑफ) केली गेल्याची रक्कम तब्बल १० लाख ५७ हजार कोटी रुपयांवर गेली आहे, असे रिझर्व्ह बँकेने ‘इंडियन एक्स्प्रेस’ने माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे.
नोकरकपातीसह, खर्चाला कात्री, ‘बायजू’कडून बंगळुरूतील कार्यालयालाही सोडचिठ्ठी!
शिक्षणतंत्रज्ञान क्षेत्रातील बायजू या नवउद्यमी कंपनीने बंगळुरूतील देशातील सर्वांत मोठे कार्यालय रिकामे केले आहे. खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. याचबरोबर कंपनीने शहरातील दुसऱ्या कार्यालयातील काही भागही रिकामा केला आहे.बायजूची बंगळुरूमध्ये तीन कार्यालये आहेत. यात कल्याणी टेक पार्कमधील ५.५८ लाख चौरस फुटांच्या कार्यालयाचा समावेश आहे. हे कार्यालय कंपनीने रिकामे केले आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कार्यालयातून अथवा घरून काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. कंपनीने प्रेस्टिज टेक पार्कमधील कार्यालयातील नऊपैकी दोन मजले रिकामे केले आहेत. कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनाही या घडामोडींना दुजोरा दिला आहे. बायजूची देशभरात एकूण ३० लाख चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळाची भाड्याची कार्यालये आहेत. कंपनीकडून गरजेनुसार त्यांचा वापर केला जातो. कार्यालयीन जागेचा विस्तार अथवा कपात करण्याचा निर्णय कंपनीची काम करण्याची धोरणे आणि व्यावसायिक प्राथमिकता यांच्यानुसार घेतला जातो. ही नियमित प्रक्रिया असून, त्यातून कार्यक्षमतेत वाढ होते, अशी प्रतिक्रिया बायजूच्या प्रवक्त्याने दिली.
आयआरसीटीसीची वेबसाईट ठप्प; हजारो प्रवाशांना फटका
काही तांत्रिक कारणांमुळे IRCTC वेबसाईट आणि अॅपवर तिकीट बुकिंगची सेवा डाउन झाली आहे. त्यामुळे वेबसाईट आणि अॅपवर तिकीट बुक करण्याऱ्या लाखो भारतीय रेल्वे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हजारो प्रवाशांना तिकीट बुक करण्यास अडचण येत आहे. त्यातच आयआरसीटीसीने आपल्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट ट्वीट केली आहे. त्यात ”तांत्रिक कारणांमुळे तिकीट सेवा उपलब्ध नाही. आमची टेक्निकल टीम समस्येचे निराकरण करत आहे. तांत्रिक समस्या दूर होताच आम्ही सूचित करू. ”
छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी देवीला दिलेले व भाविक भक्तांनी वाहिलेले दागिने गहाळ?
छत्रपती घराण्याचे कुलदैवत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांची मोजदाद केली असता, काही ऐतिहासिक महत्त्व असलेले मौल्यवान दागिने गहाळ झाल्याचे समजत आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी कोल्हापूर छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्राद्वारे केली आहे.यापुढे सर्व दागिन्यांची मोजणी ऑन कॅमेरा करावी, तसेच याचा संपूर्ण अहवाल सार्वत्रिक करावा. गहाळ दागिन्यांची संपूर्ण चौकशी करण्याची व संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा स्वराज्याच्या वतीने मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे.
भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघाने कसोटी मालिका १-०ने जिंकली. आता दोन्ही संघ २७ जुलैपासून बार्बाडोस येथे तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आमनेसामने येतील. भारतीय संघाची या एकदिवसीय मालिकेसाठी आधीच घोषणा करण्यात आली होती. आता वेस्ट इंडिजने कसोटी मालिका पूर्ण झाल्यानंतर एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली होती.भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी वेस्ट इंडिजने संघाची घोषणा केली आहे. शिमरॉन हेटमायर आणि वेगवान गोलंदाज ओशाने थॉमस यांचे वन डे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, एवढ्या महत्त्वाच्या संघाविरुद्ध मालिका असताना क्रिकेटचे महत्त्वाचे वरिष्ठ खेळाडू हे मेजर टी२०लीग खेळण्यात व्यस्त असून त्याला त्यांनी पहिले प्राधान्य दिले आहे. यातर माजी कर्णधार निकोलस पूरन आणि अष्टपैलू जेसन होल्डर यांचा समावेश आहे. या दोन खेळाडूंऐवजी वेगवान गोलंदाज जेडेन सील्स आणि यानिक कारिया यांना १५ सदस्यीय संघात स्थान मिळाले आहे.
भारत-वेस्ट इंडीज दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्याने पाकिस्तान खुश!
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी अनिर्णित राहिली. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्याच्या पाचव्या दिवशी एकही खेळ होऊ शकला नाही. अशा स्थितीत अंपायर्सनी पाचव्या दिवसाचा खेळ रद्द करून सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ हा सामना जिंकण्याच्या जवळ होता. वेस्ट इंडिजला ३६५ धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरादाखल त्यांनी दोन गडी बाद ७६ धावा केल्या होत्या आणि शेवटच्या दिवशी विंडीजला २८९ धावा करायच्या होत्या. त्याचवेळी भारताला विजयासाठी आठ विकेट्सची गरज होती.पाचव्या दिवशी ९८ षटकांचा खेळ व्हायचा होता. मात्र, पावसामुळे एकही चेंडू टाकता आला नाही. भारताने पहिली कसोटी एक डाव आणि १४१ धावांनी जिंकली होती. अशाप्रकारे टीम इंडियाने वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका १-०ने अशी खिशात घातली. ही कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ नवीन चक्रात खूप नुकसान सहन करावे लागले आहे. सध्याच्या गुणतालिकेत पाकिस्तानने भारताला मागे टाकत अव्वल स्थान गाठले आहे.
महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा: जर्मनीकडून मोरोक्कोचा धुव्वा
जर्मनीच्या संघाने यंदाच्या महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सर्वात मोठय़ा विजयाची नोंद करताना सोमवारी मोरोक्कोचा ६-० असा धुव्वा उडवला. दोन वेळचा विजेता संघ जर्मनी आणि महिला विश्वचषकात पदार्पण करणारा मोरोक्कोचा संघ यांमधील गुणवत्ता व अनुभव यातील तफावत या लढतीतून दिसून आली.जर्मनीचे आक्रमण रोखण्यात मोरोक्कोला अपयश आले. जर्मनीने ७५ टक्के वेळ चेंडू आपल्याकडे राखला आणि गोलच्या दिशेने १६ फटके मारले. पूर्वार्धात आघाडीपटू अलेक्सांड्रा पॉपने (११ आणि ३९व्या मिनिटाला) दोन गोल नोंदवत जर्मनीला भक्कम आघाडी मिळवून दिली.उत्तरार्धातही जर्मनीने आपल्या आक्रमणाची गती कायम राखली. ४६व्या मिनिटाला क्लारा बुएलने जर्मनीचा तिसरा गोल केला. यानंतर मोरोक्कोच्या एल हाज (५४व्या मि.) आणि यास्मिन मरबेत (७९व्या मि.) यांच्याकडून झालेल्या स्वयंगोलमुळे जर्मनीला ५-० अशी आघाडी मिळाली. अखेरीस ९०व्या मिनिटाला लिया शुलेरने गोल करत जर्मनीला ६-० असा मोठा विजय मिळवून दिला.
राज्यात एकीकडे मुसळधार पाऊस, पण मराठवाड्यात भयावह परिस्थिती
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचवेळी मराठवाड्यात मात्र पावसानं दडी मारलीय. सुरूवातीला झालेल्या पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेनं पेरणी केली. आत्तापर्यंत मराठवाड्यातील 86 टक्के पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागानं दिलीय. त्याचवेळी अपुऱ्या पावसानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले शेतकरी कमी पावसामुळे चांगलेच त्रस्त झालेत. आमच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. दुबार पेरणीनंतरही पाऊस आला नाही तर आम्ही काय करावं? आम्ही पूर्ण हतबल झालो आहोत, अशी भावना शेतकरी ईश्वर सपकाळ यांनी व्यक्त केलीय.
लोकसभेतील ४४ टक्के आणि राज्यसभेतील ३१ टक्के खासदारांवर गुन्हेगारी खटले प्रलंबित
संसदेतील खासदार आणि विविध राज्यांच्या किती आमदारांवर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले प्रलंबित आहेत, याची माहिती गोळा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘न्यायालयीन मित्र’ (Amicus Curiae) म्हणून ज्येष्ठ वकील विजय हंसारिया यांची नेमणूक केली होती. जुलै २०२२ पर्यंत लोकसभेच्या ४४ टक्के आणि राज्यसभेच्या ३१ टक्के सदस्यांवर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. हंसारिया यांनी ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक राइट्स’द्वारे संशोधन करून गोळा केलेल्या माहितीचा हवाला देऊन सर्वोच्च न्यायालयात याबद्दलचा १७ वा अहवाल सादर केला. याबाबतची सविस्तर माहिती लाईव्ह लॉ या संकेतस्थळाने दिली आहे.
यमुनेत मासेमारांना सापडला डॉल्फिन
यमुना नदीतून बेकायदेशीरपणे डॉल्फिन पकडून खाल्ल्याप्रकरणी चार मच्छिमारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या घटनेच्या कथित व्हिडिओची पोलिसांनी दखल घेतल्यानंतर मच्छिमारांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे असे समजतेय.पिपरीचे एसएचओ श्रवण कुमार सिंह यांनी चिलचे वनक्षेत्रपाल रवींद्र कुमार यांच्या तक्रारीचा हवाला देत सांगितले की, २२ जुलै रोजी सकाळी येथील नसीरपूर गावातील चार मासेमार यमुनेमध्ये मासेमारी करत असताना एक डॉल्फिन त्यांच्या जाळ्यात अडकला. त्यांनी डॉल्फिनला नदीतून बाहेर काढले आणि खांद्यावर घेऊन घरी नेत डॉल्फिनला शिजवून खाल्ले.
चिनी कंपनीच्या गुंतवणुकीवर फुली
चीनमधील वाहननिर्मिती क्षेत्रातील बीवायडी कंपनीने भारतात १०० कोटी डॉलरचा विद्युत वाहन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव सादर केला होता. स्थानिक कंपनीशी भागीदारीतून हा प्रकल्प उभारला जाणार होता. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने सोमवारी हा प्रस्ताव नामंजूर केला.बीवायडी आणि हैदराबादस्थित मेघा इंजिनीयरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स यांनी ई-वाहन निर्मितीचा प्रस्ताव सादर केला होता. सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर हा प्रस्ताव फेटाळला आहे. याबाबतचा निर्णय अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. चिनी तंत्रज्ञानाच्या बाबतीतील धोक्यांमुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
SD Social Media
9850 60 3590