केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात येत आहे. पूरग्रस्त परिस्थितीमुळे जे विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोहोचू शकत नाहीत त्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.
पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी देण्यात यावी, असे आदेश धर्मेंद्र प्रधान यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संचालकांना दिले आहेत. जेईई मेन 2021 सत्र 3 च्या परीक्षेला प्रविष्ट होण्याची संधी पुन्हा एकदा देण्यात यावी, असं प्रधान म्हणाले. कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील जे विद्यार्थी 25 ते 27 जुलै दरम्यान होणाऱ्या जेईई मेन जुलै सत्र 3 परीक्षेला पोहोचू शकणार नाहीत त्यांनी चिंता करु नये. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा एक संधी देण्यात येईल. परीक्षेच्या तारखा पुन्हा एकदा जाहीर करण्यात येतील, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले आहेत.
राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी महाराष्ट्रातील पूरस्थितीची परिस्थिती लक्षात घेता जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या सेशनची परीक्षेला बसण्याची संधी देण्यात यावी, अशी विनंती केली होती. त्यासंदर्भात सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांनी देखील पाठपुरावा केला होता.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाँऊटंटस ऑफ इंडियानं इंचलकरंजी, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवरील 24 जुलै रोजी होणारा फाऊंडेशन परीक्षेचा पेपर क्रमांक 1 प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस ऑफ अकाऊंटिंग हा पेपर पुन्हा घेण्यात येणार आहे. पेपरची तारीख पुन्हा जाहीर करण्यात येणार आहे. 26, 28 आणि 30 जुलै रोजी होणाऱ्या पेपरच्या परीक्षा द्याव्यात, असं आवाहन आयसीएआयनं केलं आहे.