अमेरिकचे सैनिक गेल्या 19 वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये होते. 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानच्या काही प्रांतात तालिबानची सत्ता स्थापन झाल्यानंतर अखेर डेडलाईनआधीच अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानातून परतलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तालिबानशी युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर अमेरिकन सैन्य पुन्हा मायदेशी परतलं आहे. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा काबूल विमानतळावरून अमेरिकन सैन्य निघाले तेव्हा तालिबान्यांकडून फायरिंग करण्यात आली.
रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन सैन्यांनी तीन सी-17 विमानाने सोमवारी मध्यरात्री काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं आणि त्यासोबतचं अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी सैन्य अभियानाचा शेवट झाला. अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य बाहेर पडल्यानंतर तालिबानींनी जल्लोष साजरा केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सप्टेंबर त्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत सैन्याला माघारी बोलवू असं सांगितलं, पण डेडलाईनआधीच अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानातून परतलं आहे. महत्त्वाचं म्हणजे 19 वर्ष 10 महिने आणि 25 दिवस अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून बसले होते.
दरम्यान; अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता स्थापन झाल्यानंतर तेथील नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी आणि परदेशी नागरिकांनी काबूल विमानतळावर गर्दी केली. त्यानंतर काबूल विमानतळावर अनेक बॅम्ब आणि रॉकेट हल्ले देखील करण्यात आले. यामध्ये अफगाणी नागरिक, काही तालिबानी तर अमेरिकन सैनिकांनी देखील आपले प्राण गमावले आहेत.