टाटा स्टील कंपनीने कर्मचार्यांसाठी मोठी घोषणा केलीय. कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान बरेच लोक मृत्युमुखी पडत आहेत. या काळात प्रत्येकाला आपल्या प्रियजनांना गमावण्याचं दु: ख काय आहे हे समजतंय. विशेषत: घरात कमावणाऱ्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळत आहे. घर कसे चालेल, मुलांचे शिक्षण कसे होईल, मुलीच्या लग्नाचा खर्च कुठून करायचा, अशा अनेक प्रश्नांमुळे कुटुंबाची चिंता कैकपटीने वाढलीय. केंद्र किंवा राज्य सरकार आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर कुटुंबाला पेन्शन देते, पण खासगी कंपनीतील कर्मचार्यांची काळजी कोण घेणार आहे. कोरोना साथीच्या काळात अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांच्या मृत कामगारांच्या कुटुंबीयांना काही ना काही मदत दिली, परंतु कदाचित ती दीर्घकाळापर्यंत पुरेशी नसेल.
टाटा स्टील कंपनीने आपल्या कर्मचार्यांसाठी मोठी घोषणा केली. कोरोना संकटाच्या वेळीही कर्मचारी सातत्याने कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्यावर असताना अनेक कर्मचार्यांचे मृत्यूही झाले. अशा परिस्थितीत कंपनीने म्हटले आहे की कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे सेवा पूर्ण होईपर्यंत कुटुंबास संपूर्ण वेतन (Full Salary) दिले जाणार आहे. याबरोबरच निवास आणि वैद्यकीय सुविधादेखील देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही कंपनी उचलणार आहे.टाटा स्टील मॅनेजमेंटचे म्हणणे आहे की, कंपनी नेहमीच आपल्या कर्मचार्यांच्या आणि भागधारकांच्या फायद्यासाठी विचार करीत असते. कोविडच्या काळातही टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचार्यांचे आणि समाजाच्या सामाजिक कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. यापूर्वी टाटा यांनी कर्मचार्यांच्या हितासाठी अनेक पावले उचललीत आणि एक आदर्श मानक स्थापित केला. टाटा स्टील ही देशातील पहिली कंपनी आहे, जी आपल्या कर्मचार्यांसाठी 8 तासांच्या कामाच्या शिफ्ट, कंपनीचा नफा-आधारित बोनस, सामाजिक सुरक्षा, प्रसूती रजा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची प्रभावीपणे अंमलबजावणी करते. टाटांच्या पुढाकारानंतरच देशातील इतर कंपन्यांनीही असे निकष अवलंबिले.