दहावी परीक्षा बाबत उच्च
न्यायालयात म्हणणे सादर करू
मुंबई उच्च न्यायालयाने दहावीच्या परीक्षांसदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावरून ताशेरे ओढले होते. त्यासंदर्भात देखील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भूमिका मांडली. “उच्च न्यायालयाला आम्ही आमचं म्हणणं सांगू. ही असाधारण परिस्थिती आहे. दुसरी लाट कमी असेल असं वाटलं होतं. पण करोनाची वाढ झाली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत मुलांवर याचा परिणाम व्हायला लागला आहे. आम्ही न्यायालयासमोर आमचं म्हणणं मांडू. न्यायालय यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करेल, अशी मला खात्री आहे”, असं त्या म्हणाल्या.
पाकिस्तानासाठी हेरगिरी करणाऱ्या
दोघां बहिणींना अटक
पाकिस्तानासाठी हेरगिरी करणाऱ्या दोघां बहिणींना मध्य प्रदेशातील इंदौरमधून अटक करण्यात आली आहे. इंदौरजवळील महू येथील सैन्य छावणीत हेरगिरी करत असल्याचा या दोघींवर आरोप आहे. या दोघी इंदौरच्या गवळी पलासिया भागात राहणाऱ्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या पाकिस्तानमधील व्यक्तींशी संपर्कात होत्या आणि महू सैन्य छावणीची माहिती पुरवत होत्या. काही दिवसांपूर्वी दोघी जणी रस्त्यावरून जात असताना पाकिस्तानातील व्यक्तींशी बोलत होत्या. गुप्तचर विभागाने त्यांच्या फोनची फ्रिक्वेंसी पकडली आणि त्यांचं बिंग फुटलं. संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांच्यावर सतत चार दिवस पाळत ठेवली होती.
राज्याच्या हितासाठी कटूपणा
घेण्याची माझी तयारी : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले,”राज्यात करोनाचा कहर उच्चांक गाठत असल्यानं देशभरात भीतीचं वातावरण होतं. पण मी राज्याच्या हितासाठी लॉकडाउनचा निर्णय घेतला आणि त्यासंदर्भात मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की, कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे. तो निर्णय आपल्याला घ्यावा लागला आणि नागरिकांनी खरोखर मनापासून सहकार्य केलं. त्यामुळे हे जे काही नियंत्रण आलेलं आहे, मात्र अजुन यश मिळालेलं नाही,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे १ जूननंतरच्या निर्बंधाबद्दल सूचक विधान केलं आहे.
यास चक्रीवादळ
२६ मे रोजी धडकणार
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली ही परिस्थिती पुढच्या २४ तासांमध्ये चक्रीवादळात रुपांतरीत होण्यासाठी अनुकूल अशी झाली आहे. हे वारे उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकल्यानंतर २४ मे पर्यंत म्हणजेच पुढच्या २४ तासांमध्ये त्यांचं चक्रीवादळात रुपांतर होईल. आणि त्यापुढच्या २४ तासांत म्हणजे २५ मेपर्यंत त्याचं रुपांतर अतीतीव्र चक्रीवादळात होईल. पुढे पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या दिशेने जाताना वादळाची तीव्रता वाढत जाईल. २६ मे रोजीच्या सकाळी यास चक्रीवादळ पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि बांगलादेशच्या किनारपट्टीजवळ पोहोचेल.
बारावीची परीक्षा छत्तीसगड
घेणार ओपन बुक पद्धतीने
करोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी शैक्षणिक वेळापत्रक कोलमडलं आहे. परीक्षांचा हंगाम असतानाच करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. त्यामुळे केंद्रीय शैक्षणिक मंडळाबरोबर राज्यांतील अनेक शैक्षणिक मंडळांनी दहावीची परीक्षा रद्द करत बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या. बारावीच्या परीक्षा कधी होणार? यावरूनही बरेच प्रश्न उपस्थित होताना दिसत असून, छत्तीसगड सरकारने बारावीची परीक्षा घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. यासाठी राज्य सरकारने ओपन बुक पद्धतीने परीक्षा घेण्याचं ठरवलं आहे.
स्टेरॉइड न घेताही काळी बुरशीचा
संसर्ग होत असल्याचे निष्पन्न
कोरोनातून बरे झालेल्या लोकांना काळी बुरशीच्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे. डोळे, नाक, मेंदू पर्यंत हा आजार पोहोचून अवयव निकामी करत आहे. स्टेरॉइड न घेताही काळी बुरशीचा संसर्ग होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाने दोन रुग्णांचा दाखला देत याबाबत माहिती दिली. दोन्ही रुग्ण मधुमेहग्रस्त होते. परंतु त्यापैकी एकाने स्टेरॉइडयुक्त औषधाचे सेवन केले होते. दोन्ही रुग्णांना पोटात सौम्य प्रमाणात दुखत होते. प्रकृती गंभीर झाल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक रुग्ण गंभीर झाल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.
पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा
गृहयुद्ध भडकण्याचे संकेत
१९७१ साली गृहयुद्ध भडकून दोन तुकड्यात विभागल्या गेलेल्या पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा गृहयुद्ध भडकण्याचे संकेत मिळत आहेत. एशिया टाइम्समध्ये लेखात इरफान राजा यांनी पाकिस्तान पुन्हा गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे म्हटले असून, त्यात त्यांनी कारणेसुद्धा दिलेली आहेत. कोणत्याही प्रशासनात भ्रष्टाचार, गरिबी, प्रशासनात नियंत्रण नसणे आदी कारणांमुळे समाजात घृणा आणि हिंसाचाराची भावना भडकते. या सर्व कारणांमुळे पाकिस्तानात नोकरशाहीचे अंकुश राहिलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. विशेषतः बलुचिस्तान, सिंध, पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात परिस्थिती अधिक चिघळलेली आहे.
बालपणातच रोगप्रतिकारक
शक्ती मजबूत करणे आवश्यक
एमआयटीचे वैद्यकीय शास्त्रज्ञ म्हणतात की, लॉकडाउन काळामध्ये वर्षभर जगणारी मुले ही बाहेरील वातावरणातील विविध प्रकारचे जीवाणू आणि विषाणूंच्या संपर्कापासून दूर असतात. त्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती कमी होते. बाह्य विषाणूसारख्या हल्लेखोरांशी लढण्याची तयारी त्यांच्या शरीराची नसते. त्याकरिता बालपणातच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे आवश्यक आहे. सध्या लॉकडाऊनमुळे घरातच राहण्याची वेळ आल्याने अशा बाहेरच्या वातावरणातील अन्य जिवाणू, विषाणूंचा सामना करण्याची तयारी मुलांमध्ये भविष्यात राहणार नाही.
कोविड १९ लसीकरणात कामगारांच्या
कुटुंबातील सदस्यांचा समावेश करावा
आरोग्य मंत्रालयाने सर्व मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, औद्योगिक व खासगी कामाच्या ठिकाणी असलेल्या सीव्हीसी (कोविड १९ लसीकरण केंद्रे) मध्ये लसी खासगी रुग्णालयांना खरेदी कराव्या लागतील. संबंधित नियोक्तांनी नमूद केल्यानुसार, औद्योगिक सीव्हीसी आणि कामाच्या ठिकाणी सीव्हीसीमधील कोविड १९ लसीकरणात या कुटुंबातील सदस्य आणि कामगारांच्या अवलंबितांचा समावेश केला जाऊ शकतो.
एअरलाईन्स कंपन्यांवर सायबर
अटॅक, 45 लाख युझर्सचा डेटा लिक
एअर इंडियासह जगातील अनेक आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स कंपन्यांवर एका मोठ्या सायबर अटॅकमध्ये 45 लाख युझर्सचा डेटा लिक झालेला आहे. पासपोर्ट, क्रेडिट कार्डसह आणखीही अनेक महत्त्वाचा डेटा यातून लिक झाल्याची माहिती आहे. एअर इंडियासह मलेशिया एअरलाईन्स, फिएनर, सिंगापूर एअरलाईन्स, लुफ्थांसा आणि कॅथे पॅसेफिक यांचा यात समावेश आहे. एअर इंडियाने आपल्या ग्राहकांना मॅसेजद्वारे या अटॅकची माहिती दिली आहे. SITA Pss या सर्व्हरवर अॅटॅक झाल्याची माहिती देतानाच ग्राहकांची खासगी माहिती स्टोअर व प्रोसेस केली जाते, असे यात सांगण्यात आले.
महाराष्ट्रात 33 टक्के
लोकांचे लसीकरण पूर्ण
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे कोरोना लसीकरणाची मोहिम संथगतीने सुरु आहे. अनेक ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे काही ठिकाणी लसीकरणाला ब्रेक लागला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 33 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. राज्यात जवळपास 2 कोटी 06 लाख 24 हजार 930 नागरिकांनी कोरोना लस घेतली आहे.
मराठा आरक्षण संग्रामाची
सुरुवात कोल्हापुरातून होणार
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षण लढ्याचे रणशिंग लवकरच कोल्हापूरमधून फुंकले जाण्याची शक्यता आहे. कारण, संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत सोमवारी कोल्हापुरात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कायदेतज्ञ आणि तालीम संस्थांचे प्रतिनिधी हजर असतील. शिवाजी पेठेतील शिवाजी मंडळाच्या सभागृहात सोमवारी सकाळी साडेदहा वाजता या बैठकीला सुरुवात होईल.
सरकारी कर्मचाऱ्यांना 8 व्या
वेतनाचाही लाभ मिळण्याची शक्यता
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. 7 व्या वेतन आयोगानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांना 8 व्या वेतनाचाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. 2016 मध्ये सरकारने 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली. त्यानंतर आता 5 वर्षांनी 8 व्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याशिवाय यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा नवा फॉर्म्युला ठरणार असल्याच्याही चर्चा आहेत.
कार मध्ये सापडले
साडेचार कोटी रुपये
राजस्थानच्या डुंगरपूर येथे दिल्लीहून गुजरातला जाणारी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारची तपासणी करण्यात आली असता त्यात नोटांचं घबाड सापडलं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या नोटा मोजण्यास सुरुवात केली. नोटा मोजता मोजता संध्याकाळ उलटली. पोलीस आणि अधिकारीही चक्रावून गेले. एक दोन लाख नव्हे तर तब्बल 4.5 कोटी रुपये या कारमधून जप्त करण्यात आले आहेत. दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
कुत्र्यांमध्ये आढळतो
कॅनिन कोरोना विषाणू
कुत्र्यापासूनही माणसापर्यंत नवा कोरोना विषाणू पोहोचत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे. हे वास्तव संपूर्ण जगाची चिंता वाढवणारे आहे. न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये कुत्र्यापासून संसर्ग झालेल्या कोरोना विषाणूचे निष्पन्न झाले आहे. ‘क्लिनिकल इन्फेक्शनस डिसीज’ नावाच्या जर्नलने संशोधन अहवाल प्रकाशित केला. संशोधकांनी सांगितले, मलेशियामध्ये निमोनियाच्या 301 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी आठ जणांना ‘कॅनिन कोरोना विषाणू’ची लागण झाल्याचे निदान झाले.
एक किलो प्लास्टिक द्या
आणि एक थाळी मिळवा..
छत्तीसगडच्या अंबिकापूर नगर पालिकेनेही एका कॅफेच्या माध्यमातून आयडियाची कल्पना लढवली आहे. विशेष म्हणजे या कॅफेची ही आयडियाची कल्पना आता अभ्यासाचा विषय झाली आहे. अंबिकापूरमध्ये दोन वर्षापूर्वी एक ‘गार्बेज कॅफे’ सुरू झालं. या कॅफेमध्ये पैसे दिल्यावर नव्हे तर एक किलो प्लास्टिक दिल्यावर जेवणाची थाळी मिळते. तर अर्धा किलो प्लास्टिक दिल्यावर नाश्ता मिळतो.
SD social media
9850 60 3590