करोना प्रादुर्भावाची साखळी तोडावयाची असेल तर किमान १४ दिवसांची टाळेबंदी आवश्यक असते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, केंद्राची पथके, जागतिक आरोग्य संघटना आणि राज्याच्या आरोग्य विभागाने शास्त्रीय पद्धतीनुसार हे मत व्यक्त केलेले आहे. राज्यात टाळेबंदी जाहीर करण्यासंदर्भात विचार करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह १ एप्रिलनंतर बैठक होणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. शास्त्रीयदृष्ट्या करोनाची साखळी तोडण्यासाठी १४-१५ दिवसांचा कालावधी आवश्यक असतो. त्या संदर्भात आजच आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो आहोत, असेही टोपे म्हणाले.
देशभरात २४ कोटीहून अधिक संशयित रुग्णांची चाचणी केली गेली. त्यात ५ टक्के अहवाल सकारात्मक आले. परंतु महाराष्ट्रात हे प्रमाण २२.७८ टक्के आढळले आहे. बंगळुरूमध्ये या महिन्याच्या सुरुवातीपासून १० वर्षाखालील ४७० मुलांना करोनाची बाधा झाली आहे. या शहरात एकीकडे संक्रमणाचे रुग्ण वाढत असतांना दुसरीकडे मुलांच्या घराबाहेरील विविध क्रियेत सहभाग वाढणे हे त्याचे एक कारण असल्याचे तज्ज्ञ सांगतात. महाराष्ट्रात शनिवारी १६६ रुग्णांचा मृत्यू झाला.
४० हजार रुग्णांची भर
राज्यात दिवसभऱ्यात करोनाचे तब्बल ४० हजार ४१४ नवीन रुग्ण आढळले तर १७ हजार ८७४ व्यक्ती करोनामुक्त झाले आहे. हा गेल्या काही महिन्यातील नवीन करोना बाधितांचा उच्चांक आहे. दिवसभऱ्यात राज्यात १०८ रुग्णांचा मृत्यू झाला. नवीन रुग्णांमुळे आजपर्यंत करोना बाधितांची संख्या २७ लाख १३ हजार ८७५ रुग्णांवर पोहोचली असून त्यातील २३ लाख ३२ हजार ४५३ व्यक्ती करोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत करोनाचे ५४ हजार १८१ मृत्यू झाले. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण २ टक्के आहे.