एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता भाजपलाच धक्का दिला आहे. मुंबईमधल्या 100 पेक्षा जास्त महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. दहिसरमध्ये शिंदे गटाने भाजपला गळती लावली आहे. दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा हा सोहळा पार पडला. प्रकाश सुर्वे यांचा मतदारसंघ असलेल्या वॉर्ड क्रमांक 25 मध्ये भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
एकनाथ शिंदे गटाने भाजपमधले पदाधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या पक्षात घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडलं. शिवसेनेचे 40 आमदार, 12 खासदार आणि वेगवेगळ्या शहरांमधल्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि राज्यातलं महाविकासआघाडी सरकार पडलं.
महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले, पण आता याच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शिंदेंनी त्यांच्या पक्षात प्रवेश दिला आहे. याआधी नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही काहीच दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता.