नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ यांचे समाधी मंदिर आहे. आषाढी वारीसाठी या समाधी मंदिरातून सर्वप्रथम निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होते त्यानंतर राज्यातून सर्वत्र पालख्यांचे प्रस्थान होत असते. मानाचा पालखी सोहळा असलेल्या संत निवृत्तीनाथ पालखी व्यवस्थापनासाठी अद्याप समितीच नेमण्यात आली नसल्याचं समोर आले आहे.
निवृत्तीनाथ देवस्थान मंदिराच्या समिती बरखास्त झाल्यानंतर प्रशासकांच्या मार्गदर्शनाखाली या देवस्थानाचे काम सुरू आहे. असं असताना प्रशासकांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ वारकर्यांची समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी आता देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी धर्मादाय आयुक्तांना केली आहे.
आषाढी सोहळ्यासाठी संत निवृत्तीनाथ महाराज यांचा दरवर्षी पालखी सोहळा ज्येष्ठ पौर्णिमेला प्रस्थान करत असतो .मागील वर्षी धोरणामुळे पाई सोहळा रद्द करून बस मधून काही प्रतिनिधींच्या उपस्थितीत दिंडी काढण्यात आली होती .यंदाची ही कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता मर्यादीत लोकांमध्ये पालखी सोहळा निघण्याची शक्यता आहे. यामुळे पालखीच्या व्यवस्थापनासाठी ज्येष्ठ वारकर्यांची समिती स्थापन करण्याची गरज आहे.
या समिती मुळे पालखीचे प्रस्थान, विश्राम, अभंग, काकड आरती परंपरांचे रक्षण करण्यास मदत होऊ शकते. इतकच नाही तर याचं नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन मिळू शकते . आषाढी वारीच्या सुरुवातीला संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सर्वात पुढे असते. त्यामुळे सध्याच्या प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली आतापर्यंत दिंडी सोहळा च्या व्यवस्थापनात सहभागी असलेल्या ज्येष्ठ वारकरी यांचा समावेश करावा अशी मागणी यात करण्यात आली आहे.