मेळघाटातील आदिवासी भागात संतापजनक प्रकार समोर आला आहे. यावर तुमचा देखील विश्वास बसणार नाही. अंधश्रद्धेच्या नावाखाल 3 वर्षाच्या चिमुकल्याच्या पोटाला चटके देण्यात आले आहे. चिमुकल्याच्या पोटाला गरम सळईचे 70 हून अधिक चटके देण्यात आले आहे. सध्या त्या चिमुकल्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. पण चिमुकल्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
अत्यंत संतापजनक घटना असली तरी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नाही. माहिती घेऊन कारवाई करू, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावात एका तीन वर्षाच्या बालकाला ताप आला होता. त्यावेळी त्यांना धामणगाव गडी येथील आरोग्य उपकेंद्र मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र येथेही त्याला बरे वाटत नसल्याने त्यांना रुग्णालयातुन भोंदूबाबाकडे नेण्यात आले, अंधश्रद्धेतून भोंदुबाबाने या तीन वर्षांच्या बालकाच्या पोटावर गरम आगीचे चटके दिले. याची माहिती अनिसचे हरीश केदार यांनी दिली.
सध्या बाळाला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या बाळावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. मात्र सध्या बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्याम सुंदर निकम यांनी दिली
आज राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन बाळाची भेट घेतली व बाळाच्या आई वडिलांची विचारपूस करून मेळघाटात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे आदेश दिले तसेच असे कृत्य होऊ नये म्हणून विशेष उपाययोजना करन्याचे सांगीतले तसेच भोंदूबाबावर पोलिस कारवाई करण्याचे आदेश यशोमती ठाकूर यांनी यावेळी आरोग्य विभागाला दिले.