क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एका साक्षीदाराने थेट एनसीबीवरच धक्कादायक आरोप केले आहेत. त्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय वळण घेणार याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ वकील अॕड. उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकला आहे.
एखाद्या तपास कामात तपास अधिकाऱ्याबद्दल काही आरोप झाले तर त्या अधिकाऱ्यांच्या वरिष्ठांना त्याचा तपास करण्याचा अधिकार असतो. त्याप्रमाणे या अधिकाऱ्याविरोधात साक्षीदाराने आरोप केले असेल तर ते वरिष्ठ अधिकारी तपासतात. मात्र त्या अधिकारी विरोधात कारवाई होईलच असं नाही, असं निकम म्हणाले.
हल्ली सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार सुरू आहे. तपास एखाद्या गुन्ह्याचा सुरू असतो. त्यातील एखादा साक्षीदार उघडपणे आरोप करत असेल तर याचा अर्थ तो साक्षीदार फुटला आहे, असे देखील सकृद्दर्शनी म्हणावे लागेल. त्याचा गंभीर परिणाम होतात. त्या तपास कामांत आरोप निष्पन्न झाले असतील या आरोपींवर अति विपरीत परिणाम होऊ शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
हा साक्षीदार फोडण्याचा प्रकार आहे, असा आरोप तपास यंत्रणा करू शकते. आरोपीला जर जामिनावर सोडलं तर तपास विस्कळीत होईल. तपास पुढे नेता येणार नाही. त्यामुळे एखादा सरकारी अधिकाऱ्याची वरिष्ठांनी विचारपूस केली केली तर तपास सुरू झाला असं म्हणता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
व्हॉट्सअॕप चॅटबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अनेक व्हाट्सअप चॅटमध्ये अनेक लोक गप्पा मारत असतात. त्यात अनेक गोष्टी आक्षेपर्य असतात. पण त्यामुळे त्यात गप्पा मारणारे आरोपी झाले आहेत असं म्हणता येणार नाही. अशा व्हाट्सअप चॅटमध्ये काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे का? हे पाहणं महत्त्वाचं असतं. कुठून कुठे पुरवठा होणार आहे याबद्दल माहिती आहे का? की फक्त कुठला ब्रँड चांगला? कोणती गोष्ट चांगली? याबद्दल माहिती असेल तर त्यामुळे व्हाट्सअॕप चॅटमधील माणूस त्याच्या आहारी गेला आहे असं म्हणणं योग्य होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
हे प्रकरण नक्कीच इंटरेस्टिंग झालेलं आहे. मीडियामध्ये जाणे, सोशल मीडियावर चर्चा होणे, जामीन नामंजूर झाल्यावर शेरेबाजी करणं, राजकीय व्यक्तींनी आरोप करणं, जनतेच्या मनात शंका उत्पन्न करणं हे योग्य नाही. याकडे लक्ष देणे महत्वाचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.