आज दि.२६ आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

भाजपा आणि आरएसएसशी लढण्यासाठी
शिस्त आणि ऐक्याची गरज : सोनिया गांधी

आगामी काळात होणाऱ्या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आज सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, प्रदेश प्रभारी आणि सरचिटणीस यांची उपस्थिती होती. शिवाय, राहुल गांधी व प्रियंका गांधींसह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची देखील बैठकीस हजेरी होती. यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांना संबोधित करताना, भाजपा आणि आरएसएसशी लढण्यासाठी पक्षामध्ये “शिस्त आणि ऐक्याची अत्यंत गरज” असल्याचे म्हटले.

एसटीची भाडेवाढ
५ रुपयांपासून १८५ रुपयांपर्यंत

राज्य परिवहन प्राधिकरणाच्या सोमवारच्या बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर महामंडळाने सोमवारी मध्यरात्रीपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू केली. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी सेवांना भाडेवाढ लागू होईल. ही वाढ किमान ५ रुपयांपासून १८५ रुपयांपर्यंत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना जादा भाडे मोजावे लागणार आहे. नव्या भाडेवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून, दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच सहा किलोमीटरनंतरच्या तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे.

वर्षा उसगांवकर धरणार ममता बॅनर्जींचा हात, गोव्यात करणार पक्षप्रवेश- सूत्र

तृणमूल काँग्रेस सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॕनर्जी 28 ऑक्टोबरपासून गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान एक महत्त्वाची अपडेट घडण्याची सूत्रांची माहिती आहे. प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री वर्षा उसगांवकर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

तृणमूल काँग्रेसकडून वर्षा यांच्यावर मोठी जबाबादरी देखील सोपवली जाऊ शकते. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना राजकीय वसाही लाभला आहे, त्या एका राजकीय कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील अच्युत के. एस उसगांवकर हे गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मोठे नेते होते. ते गोवा विधानसभेचे उपसभापती आणि एकापेक्षा जास्त वेळा मंत्रिमंडळाचे सदस्य होते. मंत्री होण्यापूर्वी अच्युत उसगांवकर यांनी दयानंद बांदोडकर यांच्या नेतृत्वात सरकार असताना गोव्याचे उपसभापती म्हणून काम केले. त्यामुळे वर्षा यांना राजकारणाचे बाळकडू लहानपणीच मिळाले आहे असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.

डॉक्टरच्या बनावट सहीने घेतलं 328 कोटींचं कर्ज; जालन्यातील त्या प्रकरणात ED ची एन्ट्री

जालन्यातील दीपक हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय राख यांच्या बनावट सह्या करून त्यांच्या नावावर तब्बल 328 कोटी रुपयाचं कर्ज घेतल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. नाशिक जिल्ह्यातील केजीएस शुगर इंफ्रा कॉर्पोरेशनने विविध तीन बँकांमधून 2014 साली 328 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. या कर्जाबाबत 2018 साली संबंधित बँकांनी थेट डॉ. राख यांना कर्ज वसुलीची नोटीस पाठवली होती. त्यानंतर राख यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

याप्रकरणी पोलिसांनी तपास करत मुख्य आरोपीला अटक देखील केली होती. पण अलीकडेच संबंधित प्रकरणाची सविस्तर माहिती अंमलबजावणी संचालनालयाने अर्थाच ईडीने मागवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. संजय राख हे नाशिक जिल्ह्यातील केजीएस शुगर इंफ्रा कॉर्पोरेशन या खासगी कारखान्यात संचालक होते.

पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष
करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

जीएमसी आणि स्किम्स मेडिकल कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांवर टी -२० विश्वचषकात पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यापुर्वी मनोहर गोपाला गावातील लोकांच्या निषेधावर सांबा पोलिसांनी याच प्रकरणी एफआयआर नोंदवून सहा तरुणांना अटक केली होती.

मेहबूबा मुफ्ती यांचा डीएनए दोषपूर्ण,
भारतीय असल्याचे सिद्ध करावे

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती याचा डीएनए दोषपूर्ण आहे आणि त्यांनी स्वतः भारतीय असल्याचे सिद्ध करावे लागेल, असं वक्तव्य हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी आज केलंय. मेहबुबा मुफ्ती यांच्या कालच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना अनिल विज असं म्हणाले. मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी ट्विट करत भारत पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणार्‍या काश्मिरींच्या विरोधात उमटलेल्या प्रतिक्रियांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

हवामानातील बदलाचा भारताला
बसला 65 हजार कोटींचा फटका

जागतिक हवामान संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर झालेल्या हवामानातील बदलांचा सर्वात मोठा फटका हा चीन आणि भारताला बसला आहे. आशियाला २०२० मध्ये झोडपून काढले. यामुळे पिकांचे तसंच मालमत्तेचे झालेले नुकसान झाले, अनेकांचे बळी गेले. भारताला मोठा फटका बसला. जागतिक हवामान संस्थेच्या अहवालानुसार भारताला २०२० मध्ये अंदाजे ८७ अब्ज डॉलर्सचा म्हणजेच सुमारे ६५,३५२ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तर सर्वाधिक फटका हा चीनला सुमारे २३७ अब्ज डॉलर्सचा बसला आहे.

रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी चिमुकलीने
पाठविले मुख्यमंत्र्यांना पैसे

एका लहानश्या मुलीने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना आपली पॉकेटमनीच देऊ केलीय. रस्त्यावरील खड्ड्यांमुळेच या चिमुकलीच्या आईचा दोन वर्षापूर्वी एक अपघात झाला होता. यात तिच्या आईला एक पाय गमवावा लागला. आपल्यासारखी वेळ आणखी इतर दुसऱ्या कुणावर येऊ म्हणून या चिमुकलीने एक व्हिडीओ बनवून थेट मुख्यमंत्र्यांना पाठवलाय. या व्हिडीओमधून तिने रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवण्याचं आवाहन केलंय. यासाठी तिने मुख्यमंत्र्यांना पॉकेटमनी सुद्धा देऊ केलीय. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

नवाब मलिक यांचे आरोप
बिनबुडाचे : क्रांती रेडकर

आर्यन खान प्रकरणामुळे आरोप-प्रत्यारोपांमुळे वादात सापडलेले समीर वानखेडे हे अंतर्गत चौकशीसाठी दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेत हे सारे आरोप फेटाळले आहेत. समीर वानखेडे हे गेल्या १५ वर्षांपासून काम करत आहेत. त्यांच्या कामात कुठेही त्यांनी खोटेपणा केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांना काहीही अर्थ नाही. ट्विटरवर कोणीही काहीही बोलू शकतं. पण त्याला काहीतरी ठोस बाजू हवी. समीर यांच्या शैलीमुळे अनेकांना त्रास होत आहे.

प्रभाकर साईल किंवा किरण गोसावी
यांच्याशी कोणताही संबंध नाही

आर्यन खानच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात शपथपत्र दाखल केले असून आर्यनचा प्रभाकर साईल किंवा किरण गोसावी यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे न्यायालयाला सांगितले आहे. समीर वानखेडे आणि इतर यांच्यात सुरू असलेल्या आरोपांशी अर्जदाराचा काहीही संबंध नाही, असे शपथपत्रात नमूद आहे.

नियमित पेन्शन हवी असल्यास पूर्ण करा हे काम, 30 नोव्हेंबर आहे डेडलाइन

तुम्ही देखील पेन्शनधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. दरवर्षी पेन्शनधारकांना एक महत्त्वाचे काम पूर्ण करावे लागते, ते म्हणजे तुमचे लाइफ सर्टिफिकेट जमा करणे. यावर्षी लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. हे काम पूर्ण न केल्यास तुम्हाला पेन्शन मिळण्यास अडथळा येऊ शकतो. जाणून घ्या कोणत्या पद्धतीने जीवन प्रमाणपत्र जमा करता येईल.
पोर्टलवर जमा करा जीवन प्रमाणपत्र
तुम्ही https://jeevanpramaan.gov.in/ या पोर्टलवर तुमचं लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकता. तुम्ही जीवन प्रमाणपत्र अॕप सुद्धा डाउनलोड करू शकता. याशिवाय UDAI द्वारे मान्य फिंगरप्रिंट डिव्हाइस देखील असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्ही ईमेल आयडी आणि App मध्ये सांगण्यात आलेल्या पद्धतीनुसार जीवन प्रमाणपत्र घरबसल्या जमा करू शकतात.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.