देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार केवी सुब्रमण्यम यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. केवी सुब्रमण्यम यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळेच केवी सुब्रमण्यम यांनी मुख्य आर्थिक सल्लागार पद सोडले आहे.
माझ्या कार्यकाळात मला केंद्र सरकारकडून खूप सहकार्य मिळाले. तीन दशकांच्या व्यावसायिक कारकीर्दीत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा कार्यक्षम नेता पाहिला नसल्याचे केवी सुब्रमण्यम यांनी म्हटले.
केवी सुब्रमण्यम यांनी आयआयटी कानपूर आणि आयआयएम कोलकाता यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून शिक्षण पूर्ण केले आहे. मोदी सरकारने 7 डिसेंबर 2018 रोजी त्यांची देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती केली. नियुक्तीपूर्वी ते इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक होते. त्यांचे पूर्वसुरी अरविंद सुब्रमण्यम यांनी राजीनामा दिल्यानंतर काही महिन्यांसाठी सीईएचे पद रिक्त होते. पाच महिन्यांनी 7 डिसेंबर 2018 रोजी केवी सुब्रमण्यम यांनी मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला.
मुख्य आर्थिक सल्लागार सरकारला वित्त, वाणिज्य, व्यापार, अर्थव्यवस्था यासारख्या मुद्द्यांवर सल्ले देतात. त्याचा अहवाल अर्थ मंत्रालयात केला जातो. आर्थिक व्यवहार विभाग (DEA) अंतर्गत आर्थिक विभागाची जबाबदारी मुख्य आर्थिक सल्लागाराच्या खांद्यावर असते.
आर्थिक व्यवहार विभाग (DEA) अंतर्गत आर्थिक विभाग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कल पाहतो आणि सरकारला त्याबद्दल माहिती देतो. हा विभाग सरकारला बदलत्या परिस्थितीची माहिती देतो. या सूचनांच्या आधारे सरकार आपले धोरण तयार करते.